रब्बी हंगामाची अंतीम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी – तहसीलदार सांगडेचा जिल्हाधिकाऱ्याकडे अहवाल

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : तालुक्यातील २०२३-२४ च्या रब्बी हंगामाची ७९ गावांची हंगामी अंतीम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचा अहवाल तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी नुकताच जिल्हाधिकाऱ्याना सादर केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी संबंधित काळातील तालुक्यातील पिकांची हगामी अंतिम पैसेवारी जाहीर करणेबाबतचा अहवाल सादर करणेबाबत सुचित केले होते. या सकारात्मक अहवालामुळे येथील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.

या गावातील रब्बी हंगमाची नजर पैसेवारी व त्यानंतर सुधारित पैसेवारी अगोदर ५० पैसे पेक्षा अधिक जाहीर करण्यात आली होती. गेल्या पावसाळ्यात निसर्गाने या परिसरावर अवकृपा केली. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा येथे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामही अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विविध राजकीय पक्षाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील शेवगाव, दहिगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, एरडगाव या सहा ही मंडळात दुष्काळ जाहीर झालेला आहे. तरी ही तालुक्यातील रब्बी हंगामाची नजर व सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक जाहीर झाल्याने येथील पिडित शेतकऱ्याची नाराजी होती.

त्यातच यंदाच्या उन्हाळ्याच्या सुखातीलाच पूर्व भागासह अनेक गावात पिण्याचे पाणी, व जनावराच्या चारा पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी सुरु झाली आहे. मागील खरीप हंगामात सुद्धा तालुक्याच्या खरिपाच्या ३४ गावात नजर व सुधारित पैसे वारी ५० पेक्षा जास्त  जाहीर करण्यात आली होती.

तेव्हाही तालुका प्रशासनाच्या कामकाज पद्धतीवर टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटना व विविध राजकीय पक्षाकडून सातत्याने  पाठपुरावा केला गेला त्या नंतरच खरिप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी करण्यात आली होती. आता रब्बीच्या ७९ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्यातील रब्बीच्या ७९ गावा पैकी ४१ गावांची अंतिम पैसेवारी ४९ पैसे  तर उर्वरित ३८ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे करण्यात आल्याचा अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकताच पाठविला आहे. तालुक्यातील रब्बीची ४९ पैसेवारी जाहीर झालेली गावे अशी – अमरापूर, आखेगाव तितरफा, आखेगाव डोंगर, वरूर खुर्द व बुद्रूक, भगूर, समसुद एरडगाव, लाखेफळ, जूने दहिफळ,

ढोर हिंगणी, कर्जत खुर्द, घोटण, अंतरवली खुर्द व ने, खानापूर, कऱ्हेटाकळी, बालमटाकळी, मुंगी, कांबी, हातगाव, खडके, मडके, गदेवाडी, दहिगाव ने, देवळाणे, देवटाकळी, शहरटाकळी, ढोरसडे, आंत्रे, भावी निमगाव, भातकुडगाव, मजले शहर, हिंगणगाव ने, सामनगाव, वडुले बुदूक, ढोरजळगाव ने व से, मलकापूर, गरडवाडी, आव्हाणे बुद्रूक, निंबे नांदूर, वाघोली, नांदूर विहिरे.

तर ४८ पैसेवारी जाहीर झालेली गावे अशी – शेवगाव (नगर पालिका हद्द ), सुलतानपूर खु, शहाजा पूर, खरडगाव, मुर्शदपूर, भागवत एरंडगाव, खुंटेफळ, दादेगाव, ताजनापूर, बोडखे, तळणी, विजयपूर, दहिगावसे, रावतळे, पिंगेवाडी, लखमापूरी, नवीन व जूनी खाम पिंपरी, सोनविहिर, चापडगाव, प्रभूवाडगाव, कुरुडगाव, ठाकूर पिंपळगाव, घेवरी, बक्तर पूर, सुलतान पूर बु , रांजणी, भायगाव, जोहरापूर, खामगाव, मळेगावसे, लोळेगाव, आयेगाव, आखतवाडे, वडुले खु, आव्हाणे खु, बऱ्हाणपूर.