ॲड. काकडे यांनी पी.एम.किसान योजने अंतर्गत न होणाऱ्या कामांचा काढला मार्ग

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजने अंतर्गत येथील सामान्य शेतकऱ्याना मिळणारे अर्थसहाय्य कित्येक दिवसात प्राप्त झाले नाही. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या कृषी विभागात खेड्यापाड्यातून वयोवृद्ध, लाभार्थी हेलपाटे घालत दिवस दिवस ताटकळत बसतात. कागदपत्राची पूर्तता करूनही योजनेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सोमवारी जनशक्ती मंचचे अध्यक्ष ॲड शिवाजी काकडे यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, रासपचे राजेंद्र घनवट, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, त्र्यंबक महाराज बोरुडे, ज्ञानेश्वर लोढे, राजेंद्र लोणकर यांचे सह असंख्य संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांना घेराव घातला.  

या अगोदर हे काम पीएम किसान योजनेचा ओटीपी देऊन खासगी सेतू चालक करत. मात्र, त्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करत जमिन धारक नसलेल्या अनेकांना त्याचा लाभ दिला. यात काही अधिकारी कर्मचारीही असून त्यांना शोधून आता त्याची वसूली केली जात असल्याची चर्चा असून त्यामुळे सध्या हे काम तालुका कृषी खात्याच्या देखरेखी खाली एका खासगी व्यक्ती कडून केले जाते. मात्र, शेतकऱ्यांना आगीतून फुफाटयात पडल्यासारखे झाले आहे. हे महाशाय शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावतात, शिवाय सायंकाळी सहानंतर निवांत यायला सांगतात. येथेही प्रत्येक चकरेला हात ओले करण्याची पाळी येते अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी येथे करत होते.    

यावेळी तालुका कृषी अधिकारी टकले यांनी त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने दिरंगाई होत असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदार सांगडे यांनी यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याच्या सुचना दिल्या.

ॲड. काकडे यांनी काढला मार्ग पीएम किसान योजनेचे अर्थ सहाय्य सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी केवळ मनुष्यबळ उपलब्ध नाही. म्हणून येणारी अडचण ओळखून ॲड. काकडे यांनी आपल्या संस्थेतील दोन संगणक तज्ञ सर्वांचे काम मार्गी लागे पर्यंत कृषी खात्याला आजपासूनच देऊन त्यातून मार्ग काढला.