भक्तांच्या इच्छापुर्तीसाठी भगवंत नेहमी झटत असतात – महंत रामगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ :  भक्त नेहमीच ईश्वराकडे काहींना काही मागत असतो, भगवंताला भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात. असे प्रतिपादन गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. 

प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. सह‌कारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जनकार्याची माहिती दिली.

गुरुवर्य महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, व्यासांनी सतरा पुराणे लिहीली पण त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून श्रीमद भागवत कथा हे अठरावे पुराण लिहीले. भागवत हे वेदांचे सार आहे. गुरु आणि शिष्य दोघेही एकमेकांच्या शोधात असतात. संतांच्या दृष्टीत अमृत असते. आनंदाचे अश्रू हे थंड तर दुःखाचे अश्रू गरम असतात. मन हे अत्यंत लालची व अस्थीर आहे. लालच ठेऊन केलेला परमार्थ खोटा असतो.

भक्ताला भगवंताची भाषा समजत असते.  मुर्ख माणसांवर दया करणं कधी कधी महागात पडते, आज स्त्रीच स्त्रीची वैरीन बनली आहे, भ्रूण हत्येचे पाप वाढत आहे. भगवंत आणि भाव याचं एक अतूट नाते आहे. भागवत धर्म नेहमीच चांगली शिकवण देत असतो. कलियुगात चांगल्या व्यक्तींना नेहमीच त्रास सहन करावा लागतो असेही ते म्हणाले.

कार्यक्रमस्थळी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या १९२९ ते २०२२ या ९३ वर्षाच्या काळातील संजीवनी उद्योग समुहाची उभारणी, जनसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभारलेली आंदोलने, विविध तत्कालीन पंतप्रधानांबरोबर केलेले कार्य, कुटुंब, आमदारकीचे माध्यमांतून मिळालेले मंत्रीपद, शेतकऱ्यांच्या शेतीला श्वाश्वत पाण्याच्या उपलब्धतेसाठी केलेले बंधारे, साठवण तलाव, राज्य व देशपातळीवर शेतकरी हितासाठी केलेल्या संस्थांची उभारणी, जनकार्यातून मिळालेले पुरस्कार आणि साखर व त्यावर अवलंबून असलेल्या विविध रासायनीक प्रकल्पाची अभारणी असे दहा प्रसंगानुरूप लावण्यात आलेली छायाचित्रे सर्वांचेच आकर्षण बनले आहे, नयनमनोहर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला आहे.