मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शेवगावात जागरुकता पथनाट्य

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकी दरम्यान मतदान करण्या बाबत सर्वसामान्य मतदारांमध्ये जागरुकता निर्माण होऊन जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी. तसेच मतदानाचा हक्क बजावतांना काय काळजी घ्यावी. यासाठी  शेवगाव तहसील कार्यालय व येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदानाबद्दलची जनजागृती’ या विषयावर सोमवारी शेवगाव बसस्थानक, आयुर्वेद महाविद्यालय व तहसील कार्यालया समोरील प्रांगणात पथनाट्य सादर करण्यात आले. त्यास प्रवाशांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आयुर्वेद महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पथनाट्य सादर करत हा उपक्रम राबविला. यावेळी नेते कशी आश्वासने देऊन फसवतात, दारू व जेवनाचे आमिष दाखवून, घरोघरी पैशाचे वाटप करून मतदान करवून घेतात. मात्र, निवडून आल्यावर तोंडही दाखवत नाहीत.  नोकर भरती करताना कशा प्रकारे काळा बाजार चालतो, वशिल्याने कशी कामे होतात. अशा विषयावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला.

तसेच या वर्षापासून ८५ वर्षांवरील जे वयोवृध्द आहेत त्यांना आता घरून मतदान करण्याची सुविधा निवडूणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे वयोवृद्ध म्हणून देखील कोणी मतदान टाळू नये. हेही दाखविण्यात आले. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी राखोंडे हीने उत्तम अँकरींग केले, योगेश अरोटे, मंदार बाविस्कर, करण आगे, वैष्णवी वाघ, रसिका सोमवंशी, सौरभ माळवदे, अनिकेत सोनवणे या विद्यार्थ्यांनी विविध भूमिका करत मतदाना संदर्भात जनजागृती केली.

तहसीलदार प्रशांत सांगडे, अप्पर तहसीलदार राहूल गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी, ‘मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो’. मतदानानिमित्त सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद उपभोगु या, कुठेतरी सहल काढु या’ असे विचार लोकशाहीला अत्यंत घातक असल्याचे सांगून प्रत्येकाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे नमुद केले.

आयुर्वेद महाविद्यालयचे अध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अंकुश खेडकर यांनी या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र बकरे, दिपक कारखेले, रविंद्र सानप, निलेश वाघमारे, रमेश गोरे, अविनाश देऊळगावकर यांचे सह ग्रामस्थ, प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुर्वेद महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर, प्राचार्य डॉ. बी. टी. शिंदे, उपप्राचार्य डॉ. संतोष पवळे, डॉ. एस बी  वैद्य, डॉ.अमोल घोडके, डॉ.रविंद्र गोंधणे यांचे विशेष योगदान लाभले.