शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषगाने आवश्यक त्या परवान्यासाठी गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात स्वतंत्र एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
सांगडे म्हणाले, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याच्या पदयात्रा, चौक सभा, जाहीर सभा, झेंडे, बॅनर, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध नेते जाहीर सभेसाठी जर हेलिकॅप्टरने येणार असतील तर त्यासाठी हेलीपॅड उभारणे अशा प्रकरचे परवाने सदरच्या एक खिडकी स्वतंत्र कक्षातून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच लोकसभा निवडणूक प्रचार काळात आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे. यासाठी प्रान्ताधिकारी प्रसाद मते यांचे प्रमुख उपस्थितीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची स्वतंत्र बैठक घेण्यात आली आहे.
शेवगाव -पाथर्डी २२२ विधान सभा मतदार संघात एकूण ३६५ मतदान केंद्र असून त्यात शेवगाव तालुक्यात १९४ तर पाथर्डी तालुक्य १७१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदार संघात एकूण मतदारांची संख्या ३लाख ५६ हजार ४७७ असून त्यात एक लाख ८७ हजार ३४ पुरुष, एक लाख ६९ हजार ४४१ महिला, इतर २, तर एक हजार ४५ सैनिक आहेत. यावेळी अप्पर तहसीलदार राहूल गुरव, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, नायब तहसीलदार रविंद्र सानप उपस्थित होते.