श्री कृष्ण जन्माचा सोहळा प्रत्यक्षात झाला नाट्यरूपाने सादर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : विज्ञानाने खुप प्रगती केली आहे, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले त्या सगळ्या गोष्टींचा मुख्य पाया श्रीमद भागवत ग्रंथात आहे, त्यामुळे तो श्रेष्ठ. नदी कितीही वाहात असली तरी, समुद्र कधी भरत नाही तद्वत भागवतकथा कितीही ऐकल्या तरी मन भरत  नाही असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महत रामगिरी महाराज यांनी केले. यावेळी भगवान श्री कृष्ण यांच्या जन्माचा प्रसंग नाट्य रूपाने सादर होऊन उपस्थितांच्या अंगावर आनंदी शहारे यावेत असा अनुभूती देणारा प्रसंग सादर झाला.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.               महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, मोक्षासाठी साधना करा, भगवंताचे नामस्मरण करा, कलीयुगातील दुःखे हरण करण्याचा तो सोपा मार्ग आहे. भाग्य, वैराग्य, तप या बाबींचा उद्‌बोध भागवत ग्रंथात होतो. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे.

गुणांने व्यक्ती अधिक असेल तर वंदन, कमी असेल तर दया, आणि समान असेल तर मैत्री करा या तीन गोष्टींची शिकवण धृवाला मिळाली होती. परमपुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहे. सत्संग करा त्यात देहभावभक्तीने सामील व्हा. मनुष्य जसं जसे चिंतन करतो तस तसा त्याचा स्वभाव बनतो. प्रत्येक क्षणांला सावध व्हा, त्यातुन स्वतःला सावरा म्हणजे संकटाची तीव्रता कमी होते. जीवन हे क्षणभंगुर आहे. राजा चांगला हवा तरच प्रजेचे कल्याण होत असते.  

मनुष्य थकुन जातो. सुर्याला अर्घ्य प्रिय असल्याने युवा पिढीने ते आत्मसात करावे.  गायत्री मंत्र साधनेतून शब्द सामर्थ्य वाढवावे.  २८ प्रकारचें नरक आहे, आपल्या हातून घडलेल्या पापावर नरक अवलंबून असतो. मन रुपी तारा कधी तुटु देऊ नका, त्यातून भागवत भक्तीचा विश्वास दृढ होतो. दुर्जनाला सज्जन बनविण्याचे काम संत महंतांचे असते. नाम कधीही, कसेही,  कुठेही, कसंही  घेतले की त्यातून अंकुर फुटत असतात.

भागवतातील विविध स्कंदांचे महंत रामगिरी महाराज यांनी थोडक्यात विश्लेषण केले. संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर व संजीवनी आयुर्वेदा हॉस्पिटल खिर्डीगणेश सहजानंदनगरच्या वतीने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त मोफत रुग्ण तपासणी व उपचार सेवा शिबिराचे २४ मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

भागवत कथा श्रवणासाठी प्रामुख्याने पुरुषांना बसण्यासाठी असलेल्या स्वतंत्र जागेतीलही ५० टक्के जागा महिलांनीच व्यापून टाकत हजारोंच्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड ब्रेक उच्चांक यावेळी पहावयास मिळाला. श्रीकृष्ण जन्माचा जीवंत देखावा यावेळी सादर करण्यांत आला. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंची प्रेरणा घेत सेवा हाच धर्म या बोधवाक्याचे टी शर्ट धारण केलेल्या असंख्य स्वयंसेवकांनी श्रीकृष्ण जन्माबद्दल पेढ्यांचा प्रसाद वाटप केला. थेट वृंदावन येथील कलाकारांनी उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्माचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांना हुबेहूब सजवले होते ते भाविकांना आनंद देऊन गेले.