बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आचारसंहितेचे कारण दाखवून केली बंद?

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व त्याशी निगडीत योजनेसाठी अर्ज करण्याची वेबसाईट गेल्या काही दिवसापासून निवडणूकीच्या आचारसंहितेचे कारण दाखवून बंद केली असल्याने ती वेबसाईट पूर्ववत चालू करावी  अशी मागणी माजी जि प सदस्या हर्षदा काकडे यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे मुख्य सचिव यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली.

निवेदनात पुढे म्हंटले आहे की, राज्याच्या धोरणानुसार बांधकाम क्षेत्रातील कामगाराची नोंदणी व नुतनीकरण आणि लाभाच्या योजनांची अंमलबजावनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मार्फत होते. असंघटीत बांधकाम कामगारांची नोंदणीसाठी मंडळाकडून mahabocw.in वेबसाईट गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या अचारसंहितेपासून मंडळाकडून वेबसाईट बंद करण्यात आली असल्याची तोंडी माहिती वरिष्ठ अधिकारी देत आहेत.

वास्तविक बांधकाम कामगारांच्या लाभाच्या योजना व निवडणूक अचारसंहितेचा कुठलाही संबंध येत नाही.  आरोग्यविम्याची तरतुदही या योजनेत आहे. त्यामुळे वेबसाईट बंद असल्याकारणाने कामगारांना आजारी असल्यास वैद्यकीय लाभ मिळत नाही. नवीन नोंदणी व नुतनीकरण, संसारुपयोगी साहित्य, सुरक्षा संच साहित्य, तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या अर्थसहाय्य योजनेचाही लाभ घेता येत नाही. असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कामगार हे गोर-गरीब आहेत. वेबसाईट बंद असल्याने त्यांची खुप मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.

अचारसंहितेचे कारण सांगून मुलांचे शिक्षण व आजारपण थांबवता येत नाही. त्यांच्या न्याय हक्कापासून ते वंचित होत आहेत. तरी आपणास विनंती आहे की, शासनाने निवडणूक अचारसंहितेचा कुठलाही बागुलबुवा न करता गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन सदरची वेबसाईट सुरु करून बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, नुतनीकरण व शैक्षणिक लाभ व याव्यतिरिक्त असणाऱ्या योजना वंचित व गोर-गरीब कामगारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपल्या स्तरावर आदेश द्यावेत असेही निवेदनात म्हंटले आहे.