गौतम सहकारी बँकेच्या चेअरमनपदी दंडवते व्हा.चेअरमन पदी जावळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम सहकारी बँकेच्या चेअरमन पदी सुधाकर वामनराव दंडवते व व्हा. चेअरमनपदी बापूराव दगुराव जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २०२३/२८ साठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. शनिवार (दि.१५) रोजी गौतम बँकेच्या चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगावचे नामदेवराव ठोंबळ  यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी चेअरमन पदाच्या नावाची सूचना राजेंद्र ढोमसे यांनी मांडली त्या सूचनेला बाबुराव थोरात यांनी अनुमोदन दिले तर व्हा.चेअरमन पदासाठीची सूचना विजय रक्ताटे यांनी मांडली सदर सूचनेला कमलाकर चांदगुडे यांनी अनुमोदन दिले.चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे अध्यक्षीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी बँकेच्या चेअरमनपदी सुधाकर वामनराव दंडवते व व्हा. चेअरमनपदी बापूराव दगुराव जावळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक कामी आर.एन. रहाणे यांनी सहकार्य केले.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व संचालक मंडळाने व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड व वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुधाकर दंडवते म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची दिलेली जबाबदारी खूप मोठी आहे. गौतम बँक सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासाच्या बळावर गरुड भरारी घेत आहे. प्रगतीचे हे सातत्य टिकवून ठेवून व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने बँकेला प्रगतीच्या दिशेने घेवून जाण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे याच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक विजय यादवराव रक्ताटे, सौ.रुपाली जालिंदर संवत्सरकर, सौ.सिंधुबाई रायभान रोहोम, राजेंद्र माणिकराव ढोमसे, कमलाकर रावसाहेब चांदगुडे, बाबुराव कारभारी थोरात, तुकाराम एकनाथ हुळेकर, श्रीकांत विठ्ठल तिरसे, बापूसाहेब सीताराम वक्ते, उत्तम बन्सी भालेराव, सुनिल भास्कर डोंगरे आदी उपस्थित होते.