वाचनासारखा छंद व पुस्तकासारखा मित्र नाही – डॉ. गाडेकर

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : वाचनासारखा छंद नाही आणि पुस्तकासारखा मित्र, अन् मार्गदर्शक अन्य कोणी नाही. असे प्रतिपादन बोधेगाव बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांनी केले. तालुक्यातील दहिगावशे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ. आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. गाडेकर बोलत होते.

       या वेळी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर पुस्तके वाचनाचा संकल्प केला.   अध्यक्षस्थानी सरपंच रामेश्वर भापकर होते.  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अन्सार शेख, सुनिल खरात, बाळासाहेब खरात, दत्तू  शेंडगे,  बंडू खरात, संभाजी राजगुरू उपस्थित होते. 

     डॉ. गाडेकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार मानवतावादी, समता, न्याय व बंधुत्वाचे होते.  त्यांचे पुस्तकांवर प्रचंड प्रेम होते. संत कबीर, महात्मा फुले यांच्या बरोबर ग्रंथांनाही बाबासाहेबांनी गुरू मानले होते. त्यांच्या जयंती निमित्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा बरोबर इतर चांगली  पुस्तके वाचण्याचा संकल्प करून तो अमलात आणावा. असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव जावळे, प्रकाश आल्हाट, ज्ञानेश्वर माळी  यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन सुधिर शेळके यांनी केले.