वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देवून ठोकली धूम

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : शेवगाव पोलीस ठाणे सध्या विविध घटनांमुळे चर्चेत असताना, शनिवारी दुपारी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीना  वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देवून धूम ठोकली. त्यानंतर सुमारे दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यास पुन्हा अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना भर दुपारी घडली. दोन गटात टोळी युद्धा सारखी परिस्थिती निर्माण झाली. लोखंडी रॉड, चॉपरचा व काठ्याचा वापर झाला. एकाच्या गळ्यावर केलेला वार सुदैवाने हुकला. पण त्यात त्याचा हात जायबंदी झाला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. प्रसार माध्यमे पोलिस ठाण्याच्या संपर्कात होतीच. तरीही शेवगाव पोलिसानी उशिरा पर्यंत अर्ध्या घटनेचीच तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसोना गुंगारा देऊन पळून गेलेल्या आरोपीची  घटना सर्वत्र पसरली होती.

  त्यामुळेच कदाचित त्यानंतर यासंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप यांनी त्या आरोपीच्या विरोधात पळून गेल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, तीन आरोपींना वैद्यकीय तपासणी करीता घेऊन जात असताना त्यातील एक आरोपी जमिनीवर कोसळला, यावेळी त्या आरोपींकडे लक्ष केंद्रित झाल्याचे पाहून मज्जू उर्फ मुदस्सर सय्यद हा पळून जात असताना त्यास पाठलाग करुन पकडले, असे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांना विचारले असता, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रात्री उशिरा पर्यंत माहिती देणे टाळले. फिर्यादी मध्ये नमूद कथे पेक्षा घटनेचे वास्तव वेगळे आहे.

      याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी शहरातील ईदगाह मैदानाजवळ दोन युवकांना जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी, जखमीने दिलेल्या फिर्यादी वरुन शेवगाव पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकारातील तीन आरोपींना शनिवारी ताब्यात घेतले होते. दोन पोलीस कर्मचारी व दोन गृहरक्षक दलाचे कर्मचारी त्या तिघांना वैद्यकीय तपासणी करीता शेवगाव ग्रामीण रुगणालयामध्ये घेऊन जात असताना त्यातील मुदस्सर सय्यद याने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली.

 या घटनेची माहिती मिळताच अधिकचे पोलीस बळ घटनस्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर सुमारे दोन तास त्या आरोपीचा कसून शोध घेण्यात आला. अथक शोध मोहिमेनंतर गेवराई मार्गावरील एका हॉटेलच्या ऊसामध्ये तो आरोपी सापडला. दरम्यान पोलिसांनी घटनेची वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र पोलिसांची धावपळ, पळापळ पाहून काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते दाखल झाल्यावर सदर प्रकार उघडकीस आला.

     सदर घटनेची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. चार कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन आरोपी पळून जात असेल तर तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे असल्याचे म्हणावे लागेल.