शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे सहसचिव हरीश भारदे यांची तर कार्याध्यक्षपदी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा . माधव काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर येथे शनिवारी राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. लोकसभेची निवडणूक व त्यातच होळी सणाच्या पूर्वसंसंधेला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्याने लोकसभा निवडणूक प्रचार तालुक्यात अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष भारदे व काटे यांच्या निवडीचे शेवगावचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण माजी उपसरपंच एजाज काझी, राहुल मगरे, बाळासाहेब डाके, शरद सोनवणे, प्रकाश दहिफळे, शिरीष काळे, प्रताप फडके विविध मान्यवरांनी स्वागत केले असून भारदे व काटे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शरद पवार प्रणित राष्ट्रवादी पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत मिळणार असल्याची ग्वाही काझी यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस ॲड. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात पक्ष बांधणी करून संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.