आगामी काळातील उत्सव सोहळे शांततेत साजरे करावेत – प्रांतधिकारी मते

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ :  आगामी काळात रामनवमी, हनुमान जयंती, तसेच भगवान महावीर, महामानव डॉ.आंबेडकर, महात्मा फुले या महान विभूतींचे जयंती उत्सव व रमजान इद व पाडव्यासारखे आपल्या सर्वांच्याच श्रद्धा असलेले उत्सव सोहळे येत आहेत. हे सर्व सोहळे अत्यंत शांततेत पर्यावरणाचे रक्षण करत डीजे मुक्त वातावरणात साजरे करावेत असे आवाहन प्रांतधिकारी प्रशांत मते यांनी येथे केले.

या महिन्यात विविध धर्मियांचे सण उत्सव आले असून अनेक महापुरुषांच्या जयंत्याही आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे हे सोहळे कुठेही गालबोट न लागता शाततेत पार पडावेत म्हणून तहसील कार्यालयात शहरातील विविध पक्षाचे, संघटनाचे प्रमुख कार्यकर्ते, व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक व पत्रकार यांचे उपस्थितीत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मते बोलत होते.

तहसीलदार प्रशांत सांगडे म्हणाले, या काळात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांच्या मार्गाची माहिती पोलिस ठाण्यास व तहसील कार्यालयास द्यावी. उत्सव काळात भाषण बाजीवर नियंत्रण ठेवून आचार संहितेत अडकणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीस डीजे ऐवजी आपली पारंपारिक वाद्ये लावावीत. हे सोहळे आपण सर्वजण मिळून शांततेत पार पाडून आनंद घेऊ.

यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, संतोष मगर, माजी नगरसेवक सागर फडके मनोज कांबळे, राहुल वरे, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत कर्डक, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके यांचे सह अनेक जण उपस्थित होते.

यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी डीजेला परवानगी देण्याची मागणी केली. तसेच शांतता समितीचे पूनर्गठन करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली.