असंघटित कामगार संघटनेच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तहसिल कार्यालयात मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०२ : राष्ट्रवादी काँग्रेस आणि घुले प्रणित असंघटित कामगार संघटनेच्या नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसिल कार्यालयावर मोर्चा करण्यात आलेल्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

यावेळी राष्ट्रवादी, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी असंघटित कामगारांची शासन करीत असलेल्या, हेळसांडी बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली. कोळगे म्हणाले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मोठी रक्कम उपलब्ध असताना देखील कामगारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. हे दर्दैव आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी राष्ट्रवादी प्रणित संघटना तीव्र आंदोलन करणार असून, मागण्यांची तड लावून घेणार असल्याने, बांधकाम कामगारांनी संघटने मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. या कामगारांना मध्यान्य भोजना ऐवजी त्यांच्या खात्यात तेवढीच रक्कम दर महिन्याला जमा करण्यात यावी.

इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र मेडिक्लेम योजना सुरू करण्यात यावी. घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात पाच तर शहरी भागात प्रत्येकी आठ लाख रुपये विनाफेड अनुदान बांधकाम मंडळातर्फे देण्यात यावेत. वय ६० वर्षे  झालेल्या, कामगाराना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दरमहा पाच हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन यावेळी, तहसिलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आले.

आंदोलनात तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संजय फडके, ताहेर पटेल, प्रदीप  काळे, राजेंद्र चव्हाण, अण्णासाहेब शिंदे यांचे सह स्त्री पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ReplyReply allForward