कोपरगाव मतदार संघातून खा.लोखंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ :- मागील दोनही पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांना खासदार करण्यात कोपरगाव मतदार संघाचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. २०१४ ला ५५ हजार व २०१९ ला देखील ४० हजाराचे मताधिक्य कोपरगाव मतदार संघातील मतदारांनी दिले आहे. हि परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार असून कोपरगाव मतदार संघातून खा. सदाशिव लोखंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात शनिवार (दि.०६) रोजी महायुतीच्‍या वतीने घेण्यात आलेला विजय संकल्‍प मेळावा भाजपचे स्टार प्रचारक, राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी महानंदाचे माजी चेअरमन राजेशजी परजणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील खा. सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी आव्हान करून विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले, निवडणुका आल्या की, विकासाचे मुद्दे येतात. त्यामुळे खा.सदाशिव लोखंडे यांनी निवडून आल्यानंतर कोपरगाव मतदार संघाकडे लक्ष द्यावे. २०१४ ते २०२४ मध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही काहीसे कमी पडलात ते यापुढे होवू देवू नका. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या भरघोस निधीमुळे कोपरगाव मतदार संघाचा विकास झालेला आहे. आदरणीय अजितदादांनी दिलेला शब्द माझ्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रमाण असतो.

त्यामुळे महायुती पक्षाचा महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने खा. सदाशिव लोखंडे यांच्या विजयात कोपरगाव मतदार संघाचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा राहील. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील संकटे थांबता थांबत नाही. एका संकटाशी संघर्ष सुरु असतांनाच दुसरे संकट उभे राहत आहे. दुष्काळी परिस्थितीत समन्यायीचे भूत अगोदरच गोदावरी कालव्यांच्या मानगुटीवर बसलेले असून त्याचा परिणाम मिळणाऱ्या आवर्तनावर होत असल्यामुळे लाभक्षेत्रावर मोठा अन्याय झाला आहे त्याबाबत प्रत्येक अधिवेशनात आपण आवाज उठविला आहे. सरकार कोणतेही असो सातत्याने नगर-नाशिकच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्याबाबत बैठका घ्याव्यात व अन्याय दूर करून दिलासा द्यावा.

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर १० वक्राकार दरवाजे बसविले जाणार असल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून मुकावे लागू शकते यामध्ये देखील लक्ष घालण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली. गोदावरी कालव्याचे सिंचनाचे आवर्तन आटोपले असून धरणात जवळपास साडे तीन ते चार टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठी देखील आवर्तन होवू शकते त्याबाबत पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे.

निळवंडे कालव्याच्या चाचणीतून वरच्या भागातील दुष्काळी गावांना पाणी दिल्यामुळे आजपर्यंत पाणी टिकले परंतु पुन्हा पाणी उपलब्ध करून द्यावे.यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मतदार संघातील पूर्व भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या पालखेड कालव्याच्या आवर्तनातून पाणी द्यावे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केली.