कोपरगावमध्ये आमदार काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा दे धक्का

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० :- दोन दिवसापूर्वीच कोपरगाव शहरात राजकीय भूकंप होऊन कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी प्रवेश केलेल्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजूनही कोल्हे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते.

त्याचे प्रत्यंतर दोनच दिवसात आले असून सोमवार (दि.०८) रोजी पुन्हा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात दाखल झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी कोल्हे गटाला दोनच दिवसात दुसरा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील भाजपच्या कोल्हे गटाचे अजून कोण कोण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होतील याची उत्सुकता कोपरगावकरांना लागली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोपरगाव शहरात मात्र भाजपच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सपाटा जोरात सुरू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा स्थापना दिनाच्या दिवशीच भाजपच्या कोल्हे गटाला मोठा हादरा बसला असून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, नगरसेवक बाळासाहेब आढाव तसेच इतर महत्त्वाच्या कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आ. आशुतोष  काळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता.

त्यानंतर सोमवार (दि.०८) रोजी पुन्हा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराच्या केलेल्या विकासकामांवर प्रभावित होवून आम्हालाही आपल्या प्रभागाचे अनुत्तरीत विकासासाची कामे आ. आशुतोष काळे यांच्या मार्फत मार्गी लावून विकास प्रवाहात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी सांगितले.

कोपरगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांची कोपरगाव शहरावरची राजकीय पकड अधिकच  घट्ट होतांना द्सित असून त्यामुळे त्यांची ताकद नक्कीच वाढणार आहे.

त्याचा फायदा त्यांना आगामी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत होईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बरोबरच विधानसभेच्या निवडणुकीत देखील मतदारसंघावरची पकड घट्ट करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांवर प्रभावित होवून कोल्हे गटाचे अजून अनेक कार्यकर्ते यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे यावेळी देखील सांगण्यात आले आहे.

त्यामुळे कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात इनकमिंग यापुढेही सुरूच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.