मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमात पाथर्डी तालुक्यात प्रथम तीन लाखाचा पुरस्कार

शेवगाव प्रतिनीधी, दि.२३ :  विविध उपक्रमाने विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेणा-या पाथर्डी तालक्यातील जिल्हा परिषदेच्या हनुमाननगर, खांडगाव व चव्हाण वस्ती प्राथमिक शाळेला तालुक्यातील बोधेगाव बीट मधील शिक्षकांनी भेट देत प्रेरणादायी शाळांचा अभ्यास दौरा सोमवारी केला. यावेळी तेथील शाळेच्या विविध उपक्रमांचे निरीक्षण करीत विदयार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधत असे विधायक उपक्रम आपापल्या शाळेत राबविण्याचा निर्धार शिक्षकांनी केला.

गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांच्या संकल्पनेतून स्वंयप्रेरणा, स्वेच्छेने व स्वखर्चाने राबविलेल्या या उपक्रमात डॉ. गाडेकर यांच्यासह २९ शिक्षक सहभागी झाले होते. मिरी बीटचे विस्तार अधिकारी लहू भांगरे, केंद्रप्रमुख दगडू महांडुळे, मच्छिंद्र गोरे, उपक्रमशील शिक्षक कल्याण शिंदे, ऋषिकेश एकशिंगे आदींनी स्वागत केले.     

हनुमाननगर शाळेत विदयार्थ्यांचा परिपाठ, इंग्रजी पॅटर्न, शैक्षणिक साहित्यांचा उपयोग, दप्तरमुक्त शाळा, विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी, लोकसहभागातून शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास, शाळा माझी व मी शाळेचा आदी उपक्रमांची पाहणी शिक्षकांनी केली.

हनुमाननगर या द्विशिक्षकी शाळेचे मुख्याध्यापक कैलास कासार व त्यांच्या पत्नी शिक्षिका नंदा कासार यांनी उपक्रमांची सविस्तर माहिती देत विदयार्थ्यांच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले तर त्याचे चांगले परिणाम नक्कीच मिळतात, असे अनुभव त्यांनी सांगीतले. या वेळी केंद्रप्रमुख महांडुळे, एसएमसीचे अध्यक्ष वामन जाधव, शरद कराळे, अर्जून मचे, संदिप कराळे, शंकर मचे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमात पाथर्डी तालुक्यात प्रथम क्रमांकाचा तीन लाखाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गाडेकर व बोधेगाव बीटातील शिक्षकांच्या वतीने कासार दांपत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला. खांडगाव येथील प्राथमिक शाळेत १२ लाख रूपये लोकसहभागातून राबविलेल्या विविध योजनांची पाहणीही शिक्षकांनी केली.

गुणवत्तापुर्ण शिक्षण व शाळेचा विकासाचा ध्यास घेतला तर निश्चितपणे पालक व दानशूर लोकांतून लोकसहभाग मिळतो, असे काम या शाळेतील शिक्षकांनी केल्याचे विस्तार अधिकारी भांगरे यांनी सांगीतले. चव्हाण वस्ती शाळेलाही शिक्षकांनी भेट दिली.