कोपरगाव तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार स.म. कुलकर्णी यांचे निधन

कोपरगाव प्दिरतिनिधी, दि.२४ :  येथील ज्येष्ठ पत्रकार, जुन्या पिढीतील विचारवंत व कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सदाशिव महिपती उर्फ स. म. कुलकर्णी (९०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सतिष व किरण यांचे वडील होते.

कै. स. म. कुलकर्णी यांनी प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत विविध नामांकित वर्तमानपत्रासह दुरदर्शन, आकाशवाणी आदी ठिकाणी सहा दशके काम केले. कोपरगाव पासुन ते थेट देशातील विविध राजकीय व्यक्तींबरोबरच सिने क्षेत्रातील आघाडीच्या नायकांशी त्यांचा संपर्क होता. जलसंपदा, गृह, कृषी आणि महसुल खात्यातील वरिष्ठ अधिका-यांशी त्यांची विशेष ओळख होती.

कोपरगाव, शिर्डीसह विविध ठिकाणच्या समस्यांसह गोदावरी खो-यातील पाटपाण्यांसह शेती, धरणे व गोदावरी कालव्यांच्या कामाबाबत वाचा फोडण्याचे काम केले. त्याबददल त्यांचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकारीता पुरस्काराने गौरवही झाला होता. पत्रकार स्व. शं.पा. कपिले, स्व. टी.बी.मंडलिक व स. म. कुलकर्णी हे त्रिकुट प्रसिध्द होते.

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कै. स. म. कुलकर्णी यांचा गाढा अभ्यास व जनसंपर्क होता. शिवकालीन गड, कोट, किल्ले याची त्यांना विशेष आवड होती. त्याबद्दल त्यांनी सातत्याने लिखाण केले. शिवकालीन इतिहासकार, पदमभुषण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांची विशेष मैत्री असल्यांने ऐतिहासिक स्थळांचा वारसा जोपासून त्याच्या दुरूस्तीसाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावाही केला.

त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. अहमदनगर जिल्हयातील विविध संपादक व पत्रकारांनी त्यांचा अलिकडेच २९ नोव्हेंबर २०२३  मध्ये ८९ वा वाढदिवस साजरा केला होता. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासु सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत स. म. कुलकर्णी यांनी विशेष योगदान दिले होते.

त्यांच्या निधनाबददल जिल्ह्याचे पालकमंत्री, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, विवेक कोल्हे, अमित कोल्हे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे आदिंनी शोक व्यक्त केले.