शिर्डी लोकसभा निवडणुकीत कोल्हेंची भूमिका अदयापही संभ्रमात 

कोल्हेंमुळे शिर्डीत कुणाला खासदारकीचा धोका व मोका? 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ :  शिर्डी व नगर लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरु झाली असली तरी ही कोपरगावच्या नेत्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. खास करून माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सळोकी पळो करणारे युवा नेते विवेक कोल्हे यांची भूमिका सध्यातरी गुलदस्त्यात दिसत असल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघातून खासदारकीचे स्वप्न पहाणाऱ्या उमेदवारांची झोप उडाली आहे.

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे कोणाला मदतीचा हात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये असुनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कोल्हेंच्या विरोधात सातत्याने भूमिका बजावतात. त्यामुळे विखे विरुद्ध कोल्हे आणि कोल्हे विरुद्ध काळे हा संघर्ष लपून राहीला नाही. कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी म्हणून अनेक दिग्गज राजकीय नेते कोल्हेंकडे जात आहेत. 

मंत्री दिपक केसरकर व दादा भुसे यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तरीही कोल्हे शांत भूमिकेत असल्याने शिर्डी लोकसभा निवडणुकीत भयान शांतता दिसून येत आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शिर्डी मतदारसंघात मात्र, अतिशय शांतता बघायला मिळते आहे. विशेषतः कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपले पत्ते अदयाप उघड केले नसल्याने राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

नक्की कुणाच्या पारड्यात कोल्हेंचे वजन पडणार आणि कोण खासदारकी मुकणार याचे कोडे सुटत नसल्याने कुतूहल वाढले आहे. शिर्डी मतदार संघातील प्रत्येक उमेदवाराला कोल्हे माझ्याच पाठीशी राहतील असा भास होतोय. विजयाची ग्वाही आणि मनसोक्त आकड्यांची उधळपट्टी कुणी इतर करत असले तरीही कोल्हे यांच्याशिवाय आपला विजयरथ कठीण आहे. याची जाणीव उमेदवारांना असल्याने त्यांनी कोल्हेंच्या मनाचा ठाव घेण्याचा अनेकदा प्रयत्न सुरु केला आहे.

 महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे कोल्हे यांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत त्यांच्या मंचावर चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते याही कोल्हे यांच्याकडे आकर्षीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

या लोकसभा निवडणुकीला खरी किनार आहे ती कोल्हे आणि विखे यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हे रंग भरणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. कोपरगाव सह शेजारच्या तालुक्यांमध्ये कोल्हे यांची मोठी ताकद आहे. त्यांना मानणारा मतदार मोठा आहे. याची कल्पना सर्वच पक्षांना व उमेदवारांना आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव मध्ये महायुती कार्यकर्ता मेळावा घेतला त्या मेळाव्याला कोल्हे यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. त्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार सदाशिव लोखंडे यांना सहकार्यासाठी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही कोल्हे सक्रिय झालेले नाहीत.

त्यांनतर २२ एप्रिल रोजी सदाशिव लोखंडे यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र, स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांची मंचावरील कमतरता लक्षवेधी ठरली. यामुळे मंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तब्बल एक ते सव्वा तास चर्चा करूनही कोल्हे यांनी आपले मौन अदयापही कायम ठेवल्याने व पत्ते उघड न केल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिर्डी लोकसभेत आपले राजकीय महत्व शाबूत ठेवत कोल्हेंचे सावध पावले भल्या भल्यांना कोड्यात टाकणारे आहेत. इतर मतदारसंघात निवडणुकीचा झंझावात सुरू आहे. मात्र, शिर्डी मतदारसंघात असणारी शांतता कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधून घेणारी ठरते आहे. आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

 कोल्हे यांच्या मदतीने कोणाच्या खासदारकीचा पत्ता कट होतो आणि कोण खासदार होतो याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. कोल्हे यांच्या मौनाच्या भूमिकेमुळे राज्यातील बड्या नेत्यांसह सर्वजण चिंतेत आहेत.