कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभर शिर्डी मतदार संघात ठाण मांडून होते. त्यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच मतदार संघातील महत्वाचे राजकीय पदाधिकारी, विविध संघटना, व असोसिएशन यांच्यासह बचतगटातील महिलांशी देखील त्यांनी संवाद साधला.
या बैठकीत आपण मुख्यमंत्री असल्याचा कोणताही बडेजाव याठिकाणी दिसून आला नाही. अगदी सहज कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांच्यातील कामाचा झपाटा पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. अर्ज भरल्यानंतरच्या सभे नंतर ते एका आठवड्यात दुसऱ्यांदा शिर्डीत आले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, बबनराव घोलप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, बापुसाहेब कोते, अनुराधा अदिक, आदी नेते उपस्थित होते.
शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉरेन्स याठिकाणी या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे नियोजन हॉटेल मधील दोन सभागृहात करण्यात आले होते. तसेच वैयक्तिक भेटींसाठी देखील याठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. एक बैठक संपवून दुसऱ्या बैठकीला जातानाच्या त्यांच्या वेगामुळे सुरक्षा रक्षकांसह सर्वांचीच धावपळ होत होती. आपण मुख्यमंत्री नसून आपल्या सारखाच कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागून तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे पोहचवली पाहिजे, सरकारने जास्तीत जास्त लोक कल्यानकारी योजना राबविल्या असून त्यांचा सर्वच घटकांना फायदा झाला आहे. हे घेणारे नसून देणारे सरकार असल्याचेही त्यांनी महायुतीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दारा आड चर्चा केली. सुरवातीला खासदार सदाशिव लोखंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ही चर्चा झाल्यानंतर या चर्चेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील सहभागी झाले.
विविध संघटना व पदाधिकारी यांच्याशी देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पतसंस्थेच्या विविध अडचणी मांडल्या. ठेवीदार अवसायन समिती, पतसंस्थाना वेअरहाऊस व कोल्डस्टोरेज निर्माण करण्यासाठी परवानगी, ठेवींना विमा संरक्षण याबाबतच्या मागण्या त्यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या.
डॉ. धनंजय धनवटे यांनी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाकडून होणाऱ्या त्रासाचा पाढाच कथन केला. तसेच बॉम्बे नर्सिग अक्ट नुसार फायर, इलेक्ट्रीकसह इतर ऑडीट हे दर दोन वर्षाला करण्याऐवजी दहा वर्षे करावी अशी मागणी केली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निकष ग्रामीण भागात ३० खाटां ऐवजी १५ खाटांचा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वकील संघटनेची रवि किरण यांनी राहुरी येथील आढाव दाम्पत्याच्या खुनाचा हवाला देत अँड प्रोटेक्शन अक्ट लागू करण्याची मागणी केली. पेन्शनधारक संघटनेने देखील आपले निवेदन यावेळी दिले.
बचतगटांच्या महिलांनी देखील मनमोकळेपणाने मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. बचतगटांना केले जाणाऱ्या आर्थिक सह्याबाबत देखील मुख्यमंत्र्यानी यावेळी माहिती दिली. निळवंडे पाटपाणी कृती समितीसह भोजापूर, आढळा, कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव परिसरातील पालखेड डावा कालव्याचे लाभार्थीही उपस्थित होते. सिंचनाचे प्रश्न आपण निकाली काढणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. मुळा नदी पट्ट्यातील शेतकरी देखील सेंपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट़मंडळ यावेळी मुख्यमंत्री यांना भेटले. त्यांनी वीजेच्या प्रश्नासह विविध प्रश्नावर चर्चा केली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आण्णासाहेब म्हस्के, मनसेच जिल्हाप्रमुख बाबा शिंदे, शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचोरे, जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीनराव औताडे आदींनी यावेळी आपले विचार मांडले.