शेवगावमध्ये घरोघरी जाऊन मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटप

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : येत्या १३ मे २०२४ ला होणाऱ्या लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी प्रशासन अतिशय सतर्क झाले असून  शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदार मार्गदर्शिका व मतदार स्लिप सध्या बी एलओ मार्फत गावोगावी वाड्या वस्त्या वरील घरोघरी जाऊन  वाटप करण्यात येत आहे . सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते व तहसिलदार प्रशांत सांगडे शेवगाव तहसील कार्यालयात तळ ठोकून प्रत्येक बाबीचा आढावा घेत आहेत.

शेवगाव पाथर्डी २२२  विधानसभा मतदार संघात एकूण मतदार संख्या  तीन लाख ६१ हजार ३९४ असून त्यात एक लाख ८९ हजार ४१० पुरुष तर एक लाख ७१ हजार ७७९  महिला व इतर ५ मतदार आहेत. त्या पैकी शेवगाव तालुक्यातील २ लाख  एक हजार २९० तर पाथर्डी तालुक्यातील एक लाख ५९ हजार ९o४ अशा मतदारांचा समावेश आहे. गेल्या विधान सभेच्या मतदार संख्येत आता ५ हजार मतदार वाढले असून निधन वा स्थलांतर आदि कारणामुळे ४०० मतदार संख्या कमी झाली आहे.      

शेवगाव २२२ विधानसभा मतदारसंघात एकूण ३६५ मतदान केंद्रे असून त्यातील शेवगाव तालुक्यात १५४ तर पाथर्डी तालुक्यात १७१ मतदान केंद्र आहेत. तसेच शेवगाव शहरात २६ मतदान केंद्र रहाणार आहेत.  मतदारसंघातील मतदारांना मतदार मार्गदर्शिका तसेच मतदार स्लिप वितरण युद्ध पातळीवर
गावागावात व वाडया वस्त्यावर प्रत्येक घरातील मतदारांना देण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सांगडे यांनी यावेळी  दिली. 

निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, सहाय्यक श्रीकांत गोरे, सागर गरुड, शशिकांत देऊळगावकर, सुरेश बर्डे दीर्घकाल बैठक मारून निवडणूक कार्यात योगदान देत आहेत.