खासदार लोखंडे यांच्या कार्यक्रमात झाला गोंधळ
कोपरगाव प्रतिनिधी दि. २ : खासदार लोखंडे यांच्या कार्यक्रमात विरोधक गोंधळ घालण्यासाठी पैसे देवून भाड्याचे टटू पाठवले आहेत. त्यापैकी एक मेहमूद सय्यद आहेत असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी केला.
कोपरगाव शहरात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व कार्यकर्त्यांसमवेत लोकसभा निवडणुकीची नियोजन बैठकीचे आयोजन बुधवारी दुपारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंञी बबनराव घोलप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम नुकताच सुरू झाला आणि मध्येच माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मध्येच उठून उभे राहतात खासदार लोखंडे कोण आहेत. किमान त्यांचा परिचय करुन द्या. गेल्या दहा वर्षांत ते कधी दिले नाहीत असा सवाल करताच सभागृहात बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह पालकमंत्री व खासदार आवाक झाले क्षणभर काय बोलावे ते कळाले नाही इतक्यात जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी मेहमूद सय्यद यांना खडे बोल सुनावत त्यांना खाली बसण्यास सांगितले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा कार्यक्रम कार्यकर्त्यांचा आहे, तुम्ही कसे काय आलात. असे बोलणे बरोबर नाही. तेव्हा मेहमूद सय्यद म्हणाले की, मी स्वतः होवून आलो नाही तर मला आमदार आशुतोष काळे यांनी या कार्यक्रमाला बोलावले म्हणुन आलो. आमदार काळे यांच्यामुळे येथे गर्दी आहे अन्यथा खासदार लोखंडेसाठी कोण येईल असे म्हणत सय्यद यांनी थेट पालकमंत्री यांच्यासमोर खासदार लोखंडे यांच्यावरची नाराजी व्यक्त केली.
नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर लोखंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मेहमूद सय्यद यांना कार्यक्रमात प्रश्न करुन खासदार लोखंडे यांच्या बद्दल असे का बोलले म्हणत जाब विचारला तेव्हा मेहमूद सय्यद म्हणाले की, येथे लोकशाही आहे. मी माजी नगरसेवक आहे मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. असे म्हणताच लोखंडे समर्थकांचा पारा चढला आणि काही क्षणात बाचाबाची सुरु झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जावू लागले.
आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांमध्ये समजूत घातली आणि यावर पडदा पडला. या झालेल्या घटने बद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, मेहमूद सय्यद म्हणजे कोपरगाव शहराला लागलेला कलंक आहे. माजी खासदार वाकचौरे यांचा कार्यकर्ता असुन वाकचौरे यांनी सय्यद यांना पैसे देवून आमच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी भाड्याचा टटू पाठवला आहे. सय्यद हा दररोज एक पक्ष बदलतो. त्याला कुठलीच किंमत नाही. केवळ पैसे घेवून गोंधळ घालायला आला होता असेही औताडे म्हणाले.
दहा वर्षांपासून येथील खासदार दिसले सुध्दा नाहीत खासदार कोण आहेत माहीत नाहीत जरा त्यांची ओळख करुन द्या असा तिखट प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी विचारताच खासदार लोखंडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली.
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीतून गांधीनगर येथील एका गार्डनमध्ये ओपन जिम व खेळणी बसवण्यात आली होती त्याला सय्यद यांनी विरोध केला होता. त्यामुळे दोन गटात मारामारी होवुन हिंदू मुस्लिम वाद झाला होता. सय्यद यांना लोखंडे यांनी दिलेले खेळणी मान्य नव्हते त्यावरून अनेक वादविवाद झाले आणि आज थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार लोखंडे यांच्या समक्ष वाद झाल्याने चर्चेला उधान आले.