आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकलं पाहिजे; हे वाचनातूनच घडतं – रामदास फुटाणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : “आपण आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकलं पाहिजे. हे वाचनातूनच घडतं. कारण वाचनामुळे दोन कानांमधील प्रदेश सुपीक होतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. संस्कृती घडते व संवाद वाढतो. स्व- जाणीव जागृत होते. निर्णय घेण्याची क्षमता तयार होते. म्हणूनच आपल्या मातृभाषेतील अनेक पुस्तके आणि कर्मवीर अण्णांचे जीवन चरित्र वाचले पाहिजेत. यासाठी नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे.

कदाचित पुढील काळात मानवाच्या XX आणि XY( स्री व पुरुष ) या दोनच जाती असतील. त्यामुळे जातीपातीत अडकू नये. शाळेच्या दाखल्यावरून जोपर्यंत जात हा शब्द जात नाही, तोपर्यंत एकात्म व एकसंध भारताचे सुंदर दर्शन घडणार नाही. राजकारणी स्वार्थासाठी जातीचा उपयोग करून घेत आहेत. आपण मात्र या जातीभेदाच्या खडकावर एकात्मतेचे वृक्षारोपण करायला हवे. यातूनच मारवाडी, गुजराती, पंजाबी यांच्याप्रमाणे आपणही उद्योगपती होऊ. माझ्या यशात व जडणघडणीत रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आहे.

रयतच्या शाळेतूनच माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात झालेली आहे. अशा महत्त्वपूर्ण शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रख्यात त्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. आपल्या ‘कटपीस’, ‘कोरोना संवाद’,’सफेद टोपी लाल बत्ती’ ,’भारत कधी कधी माझा देश आहे’ अशा विविध कविता व वात्रटिकांचा आधार घेत केलेले त्यांचे हे प्रबोधन सर्वांनाच अंतर्मुख करून गेले. देशातील संपत्ती तयार करणाऱ्या बळीराजावर कृषीप्रधान भारत उभा आहे. त्यामुळे तो इतर देशांप्रमाणे आर्थिक मंदीत डुबणार नाही. तसेच शिक्षकांचे फोटो विद्यार्थ्यांच्या कायम हृदयात असतात हे ध्यानी ठेवावे हेही सांगायला ते विसरले नाहीत.

येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतमआर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव, या पाच शाखांच्या वतीने नुकताच १३६ वा कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. रामदास फुटाणे बोलत होते.

कर्मवीर प्रतिमा पूजन आणि त्या नंतर सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थीनीनी सादर केलेल्या स्वागत गीत व कर्मवीर स्तवनाने आरंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याद्वारे आलेली आव्हाने, शिक्षणाचे होऊ पाहणारे खाजगीकरण, बाजारीकरण याविषयी सांगून रयत शिक्षण संस्था हे असं होऊ देणार नाही, असे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी, स्वातंत्र्यपूर्वकाळात कर्मवीरांनी ४५० शाळा अनुदानाशिवाय चालविल्याची आठवण देऊन शिक्षकभरती न होण्याच्या आजच्या काळातही रयत शिक्षण संस्था, शिक्षणाची प्रक्रिया उत्तम प्रकारे चालवत असल्याचे, त्यासाठीचा खर्च ५० कोटीहून ८० कोटीवर गेल्याचेही त्यांनी सांगितले. यामागे असलेली अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांची भूमिका आणि शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आपले शासन नंबर १ असलेल्या व एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के खर्च करणाऱ्या फिनलँडचे शिक्षण धोरण अनुसरतांना मात्र, केवळ दोन टक्के रकमेची तरतूद शिक्षणावर करत आहे. या विसंगत वस्तुस्थितीकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.” सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष मा. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार मा. अशोक काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. बिपिन कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. चैताली काळे व मा. विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य मा. पद्माकांत कुदळे, मा. कारभारी आगवन, मा. मच्छिंद्र रोहमारे, मा. बाळासाहेब कदम, मा. ॲड. संदीप वर्पे, मा. अरुण चंद्रे, महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. सुनील गंगुले, यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि पाचही शाखांचे शाखाप्रमुख प्राचार्य मा. डॉ. रमेश सानप, मा. मन्सुरी सिराज शेखलाल, मा. शेलार प्रमोदिनी, मा. सुभाष दरेकर, मा.नंदकुमार खाडे महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, प्रा. अरुण देशमुख, डॉ.अर्जुन भागवत तसेच प्रा. संजय शिंदे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

राहुल जाधव यांनी कर्मवीर जयंती दिनी शोभायात्रेसाठी टॅक्टर देवून योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबा शेंडगे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक मा.शेलार प्रमोदिनी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सीमा चव्हाण, डॉ. वैशाली सुपेकर, प्रा, डॉ. सुनिता अत्रे व प्रा.रवींद्र हिंगे यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.