कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित दि. ७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर येथे पार पडलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात शब्दगंध परिषदेच्या वतीने शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे (कार्याध्यक्ष, शाखा कोपरगाव) यांना ‘उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार- २०२३’ देउन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. शब्दगंध साहित्यिक परिषद ही साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य परिषद म्हणुन ओळखली जाते.
साहित्यिकांच्या लेखन व अभिव्यक्ति कौशल्याला वाव मिळावी म्हणुन या परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले जाते. यामध्ये साहित्य, समाज, कला, संस्कृती अशा विविध विषयांवर विचार-मंथन होत असते. साहित्य प्रेमींसाठी हे संमेलन ज्ञानाची पर्वणी असते. या संमेलनामध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातील अनेक साहित्यिक, कवि, कलावंत यांचा सहभाग होत असतो. या वर्षीचे पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झाले.
यामध्ये साहित्य यात्रा, पुस्तक मेळावा, काव्य संमेलन, महाराष्ट्राची लोककला, परिसंवाद, कथाकथन, शाहिरी जलसा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात कोपरगाव शाखेचे कार्याध्यक्ष व के.जे.सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांना ‘उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांनी मागील काही वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या माध्यमातुन शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष व अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप, १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष IAS अधिकारी मा. डॉ. पुरूषोत्तम भापकर, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक मा. बी.जी.शेखर साहेब, शब्दगंधचे अध्यक्ष मा. राजेंद्र उदागे, संस्थापक मा. सुनिल गोसावी व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
डॉ. संजय दवंगे यांना यापूर्वी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झालेला असून सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य आहे. नुकताच त्यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेचा ‘उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार’ मिळाल्याने महाविद्यालयाच्या गुणगौरवात भर पडली आहे. डॉ. संजय दवंगे यांनी पुरस्काराच्या रूपाने मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी व के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, विश्वस्त मा. संदिप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.