शेवगावा मध्ये आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना शिबिरास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ :  अनुलोम सामाजिक संघटना व शेवगाव नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत जन आरोग्य योजना नोंदणी अभियान सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि.२५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला असून शनिवारी ३० डिसेंबरला त्याची सांगाता होणार आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकार सचिन राऊत, अनुलोमचे दक्षिण उपविभाग जनसेवक दीपक रोहकले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज लांडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. नीरज लांडे म्हणाले, भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावी नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतासाठी ‘आयुष्मान भारत जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला आज खाजगी रुग्णालयामध्ये चिकित्सा वा एखादे ऑपरेशन करण्याकरता लाखो रुपयांचा खर्च येतो. अनेक गरजू गरीब रुग्णांना पैशाअभावी आपले प्राण देखील गमवावे लागतात. त्या कुटुंबाकरता ही आयुष्मान भारत जन आरोग्य योजना नव संजीवनीचे काम करणार आहे.

या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत छोट्या मोठ्या बाराशे आजारांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी महाराष्ट्रात १५ हजार रुग्णालयाचा समावेश करण्यात आला असून तेथे ऑपरेशन, प्रसूती, हृदयरोग, कॅन्सर अशा सर्वच जीव घेण्या आजारांवर विनामुल्य उपचार होणार आहेत.

या योजनेमुळे गरिबातील गरीब कुटुंब पैशाअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता केंद्र सरकार घेत असल्याचे सांगून नागरिकांनी स्वतःचे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत नोंदणी करून घ्यावी व आपला मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी यांना देखील या सुविधेचा लाभ घेण्याकरता जास्तीत जास्त प्रबोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.

मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी शिबिर काळात नाव नोंदणी होणार असून त्यातून राहिलेल्या नागरिकासाठी नगरपरिषद कार्यालयामध्ये नेहमीसाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेवगाव पाथर्डी अनुलोमचे भाग जनसेवक मेघा चिंतामणी यांनी शेवगाव शहरात एकूण दहा हजार लाभार्थी असून त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचे आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्ड वितरीत करण्याचा संकल्प यावेळेस त्यांनी बोलून दाखविला.

या कार्यक्रमास ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुरज लांडे, अमोल माने, विवेक धोंडे, सुरज कुसळकर, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व कार्ड काढण्यासाठी आलेले शेकडो गरजू लाभार्थी उपस्थित होते.