मुलाच्या लग्नात दिव्यांगाला मदतीचा हात

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : मुलाच्या विवाह प्रसंगी दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी द्रोण तयार करण्याची मशीन आहेर स्वरूपात भेट देण्याचा उपक्रम तालुक्यातील आखेगावचे भुमिपूत्र उद्योजक डॉ.डी.एस. काटे यांनी राबविला आहे. उद्योजक डॉ.डी.एस. काटे यांचा मुलगा गणेश काटे व अॅड. अजित काळे यांची कन्या साक्षी यांचा विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या डॉ. काटे यांनी चि. गणेशच्या विवाहाचे औचित्य साधून एका गरीब अपंग व्यक्तीस स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने त्यास द्रोण तयार करण्याची अद्ययावत मशिनरी भेट दिली. यापूर्वी मोठ्या मुलाच्या विवाह प्रसगी त्यांनी सर्व नातेवाईक व मित्रमंडळीना वाचनिय पुस्तकांची भेट दिली होती. 

समाजाचे ऋण म्हणून यावेळी गरजू व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. एसटी कर्मचारी नवनाथ बोडखे व अंबादास घोडके यांनी सुचविलेल्या भोकरदन तालुक्यातील करंजगाव च्या अपंग चौरंगीनाथ लोखंडे या दिव्यांग व्यक्तीला ही मदत केली. दरम्यान डॉ. काटे यांचे व्याही  ज्येष्ठ विधितज्ज्ञ अजित काळे यांनी देखील याप्रसंगी आत्महात्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५१ हजार रुपयांचा निधी जमा केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.