अपात्र शेतक-यांचे कांदा अनुदान प्रस्ताव मंजुर करावे – साहेबराव रोहोम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : शिंदे फडणवीस शासनाने अपात्र शेतक-यांचे कादा अनुदान प्रस्ताव तातडीने मंजुर करावे अशी मागणी कोपरगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी तहसिलदार व सहायक निबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक खंडेराव फेफाळे, साहेबराव लामखडे, रेवणनाथ निकम, सतिष केकाण, रमेश बोळीज यांच्यासह विविध शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 

    रोहोम पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी कांदा उत्पादक शेतक-यांचे प्रलंबित अनुदानाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. शासनाने शेतक-यांना कांदा विक्रीपोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी सात बारा उता-यावर ई पीक पाहणी खरीप कांदा पीक अशी नोंद आवश्यक होती परंतु बहुतांष शेतक-याकडुन उन्हाळ रब्बी कांदा अशी नोंद झालेली आहे.

तेंव्हा शासनाने ही अट न लावता त्रि सदस्य कांदा नोंद असल्याचा दाखला ग्राहय धरण्यांत येवुन जे शेतकरी कांदा अनुदानास अपात्र आहेत त्यांना पात्र करून प्रस्ताव मंजुरीसाठी लेखाधिकारी यांना आदेश व्हावेत म्हणजे सर्वच शेतक-यांना दिलासा मिळेल. सदरचे निवेदन प्रभारी तहसिलदार विकास गमरे यांच्यावतीने नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी स्विकारले.