राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षाचा आमदार काळे यांना घरचा आहेर – विनोद राक्षे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. त्या विरोधात नागरिकांमध्ये आमदार काळे व मुख्याधिकारी गोसावी यांच्या गलथान कारभाराचा रोष निर्माण झाला आहे. नागरीकांना होणारा त्रास दुर्लक्षित करून कोपरगाव शहराचा छळ सुरू आहे. त्या कारभारा विरोधात शहर भाजपा आक्रमक झाली असताना व आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली असताना खुद्द राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी शिष्टमंडळ घेऊन पालिकेत निवेदन देत आमदार काळे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करून त्यांना तो घरचा आहेर असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी दिली आहे.

आमदार काळे यांचा प्रशासनावर वचक नाही तसेच या गाळमिश्रित पाण्याचे नियोजन करण्यात त्यांना अपयश आल्याने कोपरगाव राष्ट्रवादी स्वतःच संभ्रमात अडकली आहे. शहरातील विकासकामे आणि रस्ते यासाठी आमदारांनी निधी आणला अशी पाठ थोपटून घेणारे गढूळ पाणीही त्यांच्याच  कारभाराची देणं आहे. यावर मात्र, सपशेल मौन बाळगून आहे.

नगरपालिका क्षेत्राला विशेष निधी आणि नियमित निधी प्राप्त होत असतो. त्यामुळे त्यात आमदारांचा काहीच संबंध नाही. एकीकडे स्वच्छ पाण्याचे आश्वासने द्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र गढूळ पाण्याची गॅरंटी कोणी घ्यायची यावर जनता सवाल विचारते आहे. प्रशासक राज असताना मुख्याधिकारी गोसावी यांचे दालन केवळ ठेकेदारांच्या तोडोपानी करून आमदारांचे स्वय सहाय्यक यांचे वैयक्तिक सूत्र केंद्र बनून आहे हे शहारला ठाऊक आहे.

शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी सत्ताधारी आमदार काळे आणि प्रशासक मुख्याधिकारी गोसावी हे सपेशल आपली जबाबदारी झटकून नसलेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यात मग्न आहे. इतर विकासाचे प्रश्न सुटण्यासाठी जनतेला वेड्यात काढून वेळ मारून नेऊ नका. नैतिक जबाबदारी स्विकारून शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावा.

स्वतःचे पदाधिकारी आता आंदोलन आणि नैराश्य दाखवू लागले आहेत. याचा आमदार काळे यांनी विचार करण्याची वेळ आली असून त्यांच्या कारभारावरच आता राष्ट्रवादीच्या भूमिकेने प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सद्या पालिकेत ना नगरसेवक आहेत, ना निवडणूक निर्वाचित कुणी पदाधिकारी त्यामुळे आमदार आणि मुख्याधिकारी यांचे साटे लोटेच या गैर कारभाराचे धनी असल्याची प्रतिक्रिया विनोद राक्षे यांनी दिली आहे.