शेवगाव तालुक्यातील एकास जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

दि. ६ मे रोजी भातकुडगाव फाट्यावर रास्ता रोकोचे निवेदन


शेवगाव प्रतिनिधी, दि . ३ : तालुक्यातील शहर टाकळी गावांमध्ये गुरुवारी (दि २ )  रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून सात – आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय संजयआपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी ) यास गंभीर जखमी केले. त्यास उपचारासाठी तातडीने  शेवगाव ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले. मात्र रक्तस्राव अधिक झाल्याने  रात्री ११.५० ला त्याचा उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.

          शेवगाव पोलीस पोलिस ठाण्यात मृताचा  बंधू संकेत संजय आपशेटे (वय २८ )  याने दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता  १८६० प्रमाणे  भा.द.वि.  कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९,  ३२३ प्रमाणे आरोपी  अजय दावीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे  व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार इसमाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवीचा छबीना पहाण्यासाठी चूलत भाऊ अनिकेत याचे समवेत गेलो असता ओरडण्याचा आवाज आल्याने पुढे गेलो असता  मंदिराजवळ स्ट्रीट लाईटमध्ये वरील पाच जण व इतर मिळून सात – आठ जण अक्षय संजय आपशेटे यास लाथा बुक्क्यांनी आणि घातक शास्त्राने जबर मारहाण करताना पहिले. आम्ही तेथे गेल्यावर मारेकरी पळून गेले. अक्षयला डोक्याच्या मागे, उजव्या कानाच्या मागे गंभीर मार लागून रक्तस्राव होत होता. आम्ही काही ग्रामस्थाच्या मदतीने त्यांना स्थानिकडॉक्टरकडे प्राथमिक उपचार करून ॲम्ब्यूलन्सने शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

  शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत. गुन्ह्याचा तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील पो. नि. दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जोपर्यंत सर्व  आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्याने व गावातील  काही जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्याने अखेर साडेपाचच्या सुमारास अत्यंत शोकाकूल वातावरणात अक्षय याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान ग्रामस्थांनी यासंदर्भात सर्व ७ – ८ आरोपीना अटक करावी या  प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी सोमवार दि. ६ रोजी भातकुडगाव  फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेआहे. यावेळी शहरटाकळी गावबंदचे आवाहन देखील करण्यात आल्याने  आज दुसऱ्या दिवशीही गाव बंद होते.

  या संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुन्हयातील फरार आरोपींना त्वरित जेरबंद करून त्यांचेवर सक्त कारवाई करावी. तसेच गुन्हया मागील सुत्रधाराचा शोध घेऊन त्याचेवरही कारवाई व्हावी. पंचनाम्या पूर्वी घटना स्थळावरील रक्त धुण्यात आले. ते कोणी धुतले?  त्यांच्या  त्यामागील उद्देशाची तपासणी व्हावी. शहर टाकळी येथील गेल्या अनेक दिवसा पासून बंद असलेले दूरक्षेत्र पुन्हा सुरु करून तेथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांची कायम स्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. तसेच  शहर टाकळी परिसरातील सर्व अवैध धंदे  त्वरित बंद करण्यात यावेत. आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.