शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : गेल्या कित्येक दिवसापासून तालुक्यातील खरडगाव सब स्टेशन मधील नादुरुस्त ५ एम व्ही ए ट्रांसफार्मर तातडीने दुरुस्त करावा. अन्यथा मंगळवार दिनांक १५ रोजी वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले जाईल. असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरुर बुद्रुक व खुर्द या भागातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून महापूर व अतिवृष्टीच्या भयानक नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्यावर्षी नानी नदीच्या महापुराने ९ गावाच्या शिवारातील खरीप वाया गेला. एवढेच नाही तर जमीनी खरडल्या गेल्या. खळ्यातील धनधान्य चारा व जनावरे ही वाहून गेली. तर त्यानंतरचा रब्बी हंगाम अपुऱ्या वीजपुरवठ्या मुळे साधला नाही. तशात ;यावर्षीही संकटाने पाठ सोडली नाही.
चालू खरीप हंगाम पुन्हा अतिवृष्टीमुळे वाया गेला. पाऊस उघडल्याने शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत असून बागायती गहू ,हरभरा , ज्वारीची पेरणी केली आहे. आता जोमात उगवलेल्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतु वीजपुरवठा अपूर्ण व खंडित आहे त्यामुळे काही पेरण्याही खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे .तरी संबंधित ५ एम व्ही ए ट्रांसफार्मर त्वरित दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. असे नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर वरूर सहकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन माणिकराव म्हस्के, मच्छिंद्र वावरे, ओम प्रकाश धूत, शेषराव खांबट, मधुकर वावरे, अर्जुन म्हस्के, सुरेश वावरे, सालवडगाव सेवा संस्थेचे चेअरमन आदिनाथ लांडे, दीपक रुईकर, मारुती भापकर, अर्जुन निकते, लक्ष्मण गिरमकर आदींच्या सह्या आहेत.