क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा ने शेवगावचे रसिक भारावले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने आयोजित अनामवीर नाईक कृष्णाजी साबळे यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘क्रांतिवीरांची शौर्यगाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने शेवगावचे रसिक श्रोते भारावून गेले. येथील शिवशाहीर कल्याण काळे यांनी सादर केलेली क्रांती गीते, शाहिरी, पोवाडे व राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते व प्रबोधन पर भारुडाने रसिकांच्या मनावर गारुड केले.

      खालची वेस परिसरातील श्री पावन मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या आवारातील सभागृहात  ‘क्रांतिवीरांची शौर्यगाथा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. प्रारंभी सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाठ यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज, अनामवीर  साबळे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

        शिवशाहीर काळे यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राचा जयजयकार करणाऱ्या गीताने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यांनी अनामवीर साबळे , शहीद भगतसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे सादर केले. तर राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद यांनी प्रबोधनपर भारुड सादर केले.  

 नवोदित शाहीर अक्षय डांगरे यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या पराक्रमी इतिहासाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. जालिंदर जाधव यांनी अप्रतिम असे थाळी व समई नृत्य  केले. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद यांनी सादर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी मारुती महाराज झिरपे, चंद्रकांत लबडे महाराज, ॲड. कॉ. सुभाष लांडे, राजश्री रसाळ, डॉ. ओंकार रसाळ, नगरसेवक सागर फडके, कॉ. संजय नांगरे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष नवनाथ कवडे, सचिव राजेंद्र जगनाडे,  मच्छिंद्र बर्वे,  जयप्रकाश देशमुख, डॉ. कृष्णा देहाडराय, डॉ.लांडे आदींनी सहकार्य केले. लोककला अभ्यासक भगवान राऊत त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.