कोल्हे कारखान्याच्या बॉबी एम्बॉस नावाने बनावट दारू साठा जप्त

Mypage

आर्थीक नुकसान भरपाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कोल्हे कारखान्याचा इशारा

Mypage

कोपरगांव प्रतिनधी, ३० :  श्रीरामपुर तालुक्यातील खंडाळा येथील देशी मद्य निर्मीती करणा-या चितळी बॉटलींग प्रा. लि.च्या श्रीरामपुर व अहमदनगर येथील गोदामावर छापा टाकुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या बॉबी एम्बॉस बॉटलचा मोठया प्रमाणांत साठा जप्त करण्यांत आला त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

            याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत तयार होणारे देशी मद्य बॉबी या नावाने बाजारात लोकप्रिय असुन त्याचा मोठया प्रमाणांत ग्राहकवर्ग आहे. कारखान्यांने बॉबी एम्बॉस बॉटल कॉपी राईट व ट्रेड मार्क अॅक्ट खाली रजिष्टर करून घेतले असुन त्याचे सर्व अधिकार हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याकडेच आहे. बॉबी एम्बॉस बॉटल वापरून त्यातुन अन्य देशीमद्य उत्पादकांना मद्य विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

           श्रीरामपुरच्या खंडाळा येथील चितळी बॉटलींग प्रा.लि. मध्ये तयार होणारे मद्य त्यांनी बॉबी एम्बॉस बॉटल मध्ये भरून त्यातुन बाजारात विक्रीची व्यवस्था सुरू होती याची माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनास मिळाली त्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक २८१८१ / २०२२ दाखल करण्यांत आली होती, त्यात कोर्ट रिसीव्हर यांच्यामार्फत २२ सप्टेंबर २०२२ रोजी चितळी बॉटलींग प्रा लि. खंडाळा श्रीरामपुर व अहमदनगर येथील गोदामावर छापा टाकण्यांत आला.

तेथील मद्यसाठयाची २३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळ पर्यंत तपासणी करण्यांत आली त्यात चितळी बॉटलींग हे बॉबी एम्बॉस बॉटल मोठया प्रमाणांत वापरत असल्याचे आढळुन आले व त्यांच्या गोदामातुन बॉबी एम्बॉस बॉटलचा मोठया प्रमाणांत साठा जप्त करण्यांत आला.

           सदर छाप्यामुळे बॉबी एम्बॉस बॉटल वापरणा-या देशीमद्य उत्पादकामध्ये व त्यांचे ब्रँड विक्री करणा-या सी. एल. ३ विक्रेत्यामध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. जे कुणी देशी मद्य उत्पादक व विक्रेते बॉबी एम्बॉस बॉटलचा वापर अथवा बॉबी लेबलची साध्यर्म नक्कल करतील त्यांच्यावर आर्थीक नुकसान भरपाईची व फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन करेल असा इशारा देण्यांत आला आहे.