श्रावण बाळ योजनेची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा

पैसे काढण्यासाठी नागरिकांची बँकेत झुंबड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शासनाच्या संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी आदि निराधार व स्वावलंबन योजनेच्या तालुक्यातील एकूण २२ हजार ५७५ लाभार्थ्याना जूलै ते सप्टेबर २०२३ या कालावधीतील तब्बल सहा कोटी ४५ लाख ४२ हजार रुपये अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याने ती रक्कम काढण्यासाठी विविध बँकात लाभार्थ्यांची झुंबड उडाली असून योग्य वेळी पैसे मिळाल्याने लाभार्थी प्रशासनास धन्यवाद देत आहेत.

या योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वी महिन्याला प्रत्येकी एक हजार अनुदान मिळत असे त्यात जुलै २०२३ पासून प्रत्येकी ५०० रुपये दरमहा वाढ करण्यात आली असून योजनेच्या लाभार्थ्यांना आता १५०० रुपये महिन्याप्रमाणे देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘दुधात साखर’ पडल्याचा आनंद झाला आहे.

ऐन दिवाळी सणाच्या काळात हे अनुदान प्राप्त होण्यासाठी तसेच ते लाभार्थ्याच्या बँकाना वेळीच वर्ग करण्यासाठी तहसीलदार प्रशांत सांगडे, परिक्षा विधीन तहसीलदार राहूल गुरव यांनी जातीने लक्ष घातले. शाशिकांत देऊळगावकर, अशोक रुईकर यांनी त्यासाठी योगदान दिले. या बहुअंशी लाभार्थ्यांची खाती जिल्हा सहकारी बँकेच्या शाखामध्ये असून तेथे देखील होणाऱ्या सहकार्यामुळे या वेळची गोरगरीबांची दिवाळी गोड होणार आहे.