आयुष्यमान भारत योजनेचा पहिल्याच दिवशी ३०० लाभार्थीनी घेतला लाभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड रजिस्ट्रेशनच्या पंधरवड्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गावातील ३०० लाभार्थीना योजनेचे कार्ड काढून देण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेचे मुंबईचे प्रोग्रामिंग हेड अमर मिसाळ त्यांचे सहकारी सुनील कर्डेकर, उमेश भालसिंग आणि वाघोली गावचे भूमिपुत्र मेजर विठ्ठल वांढेकर दक्षता अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना अहमदनगर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी वाघोली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील सर्वच नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असं आश्वासन आलेल्या मान्यवरांनी दिले. उमेश भालसिंग यांनी आयुष्यमान ग्राम ही संकल्पना संपूर्ण गावामध्ये पंधरा दिवसांमध्ये राबवून संपूर्ण गावातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेसी जोडून देण्याचे काम करू असे आश्वासित केले.

उद्यापासून आरोग्य मित्र व आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प ग्रामपंचायत कार्यालयात राबविण्यात येणार आहे. राजेंद्र जमधडे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.