संगमनेर प्रतिनिधी, दि.७ : शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि राजकीय विरोधकांचा समाचार घेतला.
उत्कर्षा रूपवते या काल रात्री कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपून संगमनेरला परतत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला होता. त्यात त्यांच्या कारची काच फुटली असून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
निवडणूकीत विरोधकांना त्यांची हार स्पष्ट दिसत आहे म्हणून घाबरलेल्या प्रस्थापितांनी रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. काल रात्री माझ्यावर झालेला हल्ला हा त्याचाच भाग होता. पण हा अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे, असे त्या आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.
स्वातंत्र्यानंतर शिर्डी लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच एक महिला उमेदवार निवडणूक लढत आहे. गेल्या 20 वर्षात मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे, परंतु कधीही मला असा अनुभव आला नाही. पण आज शिर्डी लोकसभा निवडणूकीत एक सक्षम उमेदवार म्हणून माझे आव्हान उभे राहिले असल्याने माझ्यावर भ्याड हल्ला केला गेला आहे. हल्ला करणारे माझे विरोधकच आहेत हे सर्वांना माहिती आहे.
विरोधकांनी लक्षात ठेवावे, मी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेक असून निवडणुकीचे मैदान काही सोडून जाणार नाही. इतर पक्षांप्रमाणे वंचित बहुजन आघाडी हा धनदांडग्यांचा पक्ष नाही. पण माझ्यामागे वांचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खंबीरपणे उभे आहेत. जनता माझ्यासोबत उभी आहे. या हल्ल्यामुळे माझा निर्धार दुपटीने वाढला आहे. आम्ही सर्वजण निवडणूक दुप्पट ताकदीने लढवू आणि जिंकून येऊ, असा विश्वास यावेळी उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला.
दरम्यान उत्कर्षा रूपवते या शिर्डी लोकसभेच्या वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवार असून महायुतीचे सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात लढत आहेत. उत्कर्षा रूपवते यांच्यावर लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका महिला उमेदवारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा समाजमाध्यमे आणि ठिकठिकाणहून निषेध व्यक्त केला जात आहे.