कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : रविवारी (९ एप्रिल) कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी तसेच इतर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, स्नेहलताताई कोल्हे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली. तसेच शेतीच्या नुकसानीचे व्हिडीओ चित्रीकरण पाठवून नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी कोल्हे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली.
कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात अनेक ठिकाणी रविवारी (९ एप्रिल) सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. अनेक भागात गारपीट झाली. प्रामुख्याने कोपरगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी व परिसरात रविवारी सायंकाळी गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
तसेच फळ बागांसह चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. सरकारने लवकरात लवकर गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला द्यावेत. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून सबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आजवर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना राज्य सरकारने पूर्वीच्या निकषात बदल करून शेतकऱ्यांना अर्थसाह्य केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी न डगमगता रब्बी हंगामात पिके घेतली होती;
परंतु शेतकऱ्यांवर एकामागून एक नैसर्गिक संकट येत आहे. अशा अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याची आवश्यकता आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असताना रविवारी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. त्यासाठी प्रशासनाने गारपीट व अवकाळी पाऊस झालेल्या भागात ताबडतोब पाहणी करून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी सूचनाही स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.