सासऱ्याने केला १ वर्षाच्या नातीसह सुनेचा खून

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : तालुक्यातील मजले शहर येथे रात्री काल गुरुवारी रात्री स्वतःच्या एक वर्ष ११ महिन्याच्या नातीचा व  पाच महिन्याची गरोदर असलेल्या सुनेचा सख्या सासऱ्याने खून केल्याची घटना घडली आहे.  ऋतुजा संतोष लोढे (वय २२ ) व समृद्धी संतोष लोंढे वय ( १वर्ष ११ महिने ) अशी खून झालेल्या दुर्दैवी मृतांची नावे आहेत.

       या संदर्भात मृत युवतीचे चुलते जनार्दन नारायण मगर वय ५० वर्ष , धंदा शेती रा. मजलेशहर ता. शेवगांव जि. अहमदनगर  यांनी काल गुरुवारी रात्री ११ . ३५ वाजता तीचे सासरे कारभारी ज्ञानदेव लोढे वय ६० राहणार मजलेशहर याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल तपास करीत आहे.

      मगर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीची पुतणी ऋतुजा संतोष लोढे हीचे चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी सासरा कारभारी लोढे मागील सहा महिन्यापासून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करीत होता. ती पाच महिन्यांची गरोदर असताना तिचा सासरा कारभारी लोढे याने ऋतुजाचा गळा दाबून जीवे ठार मारले आहे.

तर तिची मुलगी समृद्धी लोढे या एक वर्ष ११ महिन्याच्या नातीला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या बकेटमध्ये बुडवून दाबून धरून जीवे ठार मारून टाकले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत परिसरात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.