शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील मुंगी शिवारातील गट क्रमांक ८५ मध्ये गांज्याच्या झाडाची लागवड केली असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने शेवगाव पोलिस पथकाने तेथे शासकीय पंचा समक्ष छापा टाकून ८ लाख ९६ हजार २०० रुपये किंमतीची १७९ किलो २४ ग्रॅम वजनाची गांज्याची लहान मोठी ९४ हिरवी झाडे व तीन सुकलेली झाडे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्राने दिली.
या संदर्भात पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून संशयीत आरोपी मुकुंद विनायक होळकर रा .मुंगी ता शेवगाव यास ताब्यात घेण्यात आले असून एनडीपीएस कायदा सन १९८५ चे कलम २० (ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, पोनि दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. अमोल पवार, सहाय्यक फौजदार राजू ससाणे, हेकॉ परशराम नाकाडे, किशोर काळे, पोना. उमेश गायकवाड, बाप्पा धाकतोडे, पोकॉ अमोल ढाळे, एकनाथ गर्कळ, संतोष वाघ, पोहे कॉ. बडे यांचे पोलिस पथकाने ही कामगिरी केली.