आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक भगवान बिरसा मुंडा जयंती भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे जनसंपर्क कार्यालय कोपरगाव येथे साजरी करण्यात आली.   

या कार्यक्रमास अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष देवराम पगारे, अकबर शेख, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, विष्णुपंत गायकवाड, शंकर बिऱ्हाडे, दीपक जपे, डॉ. अनिल जाधव, सतीश चव्हाण, धनंजय धनवटे, संजय तुपसुंदर, शुभम पाठक आदी उपस्थित होते.

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात असामान्य शौर्य गाजवून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.   इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून आदिवासी समाजात नवचैतन्य जागविण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली, त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडा यांनी लढा उभारला.

आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उपसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदावर काम करण्याची संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे असे पराग संधान म्हणाले.