कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : भारतीस स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेली, परंतु आजही देशातील बहुतांशी आदीवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात आलेला नाही. माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांची आदीवासी समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहीजे, त्यांची प्रगती झाली पाहीजे, अशी तळमळ असायची व या हेतुने तालुक्यातील टाकळी येथे २००४ साली एकलव्य आदीवासी आश्रम शाळेची स्थापना केली व आदीवासी मुला मुलींना शासनाच्या माध्यमातुन विनामुल्य शिक्षणाची सोय केली.
या विध्यार्थांना कोणीतरी मित्र पाहीजे, त्यांच्याबरोबर खेळले पाहीजे, त्यांना आपलेसे केले पाहीजे म्हणुन संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने संपुर्ण देशात साजरा होणारा बालदिन एकलव्य आदीवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करून अनोखा उपक्रम राबविला.
बालदिन साजरा करताना संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी चित्र रंगविणे, पपेटचा वापर करून गोष्ट सांगणे, विविध गाण्यांवर नृत्य सादर करणे, इत्यादी उपक्रमांचा अवलंब केला. तसेच संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी आदीवासी विध्यार्थ्यांसाठी खेळणे व कपडे भेट म्हणुन दिले.
या सर्व बाबींमुळे आदीवासी विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांना इतर जग काय असते याची जाणिव झाली, तर संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्येही वंचीत घटकाप्रती आपण काही देणे लागतो, या विचार धारेची रूजवण झाली.
सदर प्रसंगी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा जोशी, प्राथमिक विभागाचे प्रमुख आण्णा टकले, अशोकराव थोरात आणि शिक्षकांनी संजीवनी अकॅडमीच्या प्रती धन्यवाद व्यक्त केले. आपापल्या मित्रांसोबत, तसेच आपल्याच शाळेत अनेक विद्यार्थी बालदिन साजरा करतात.
परंतु एकलव्य आदीवासी आश्रम शाळेतील काही विद्यार्थी त्यांच्या मागील अनेक पिढ्यांमधील पहीले शिक्षण घेणारे बालक आहेत. अशा विध्यार्थ्यांबरोबर संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी बालदिन साजरा केला. या उपक्रमाचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी कौतुक केले.