प्लॅस्टिक कॅरीबॅग वापराबाबत नागरिकांना सजग करावे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : प्लॅस्टिक कॅरीबॅग वापराबाबत नगरपरिषदेने केवळ किराणा व्यापाऱ्यांना टार्गेट करू नये. याबाबत अगोदर नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग न वापरण्याबाबत सजग करावे. तसेच हेतू पुरस्कार फक्त किराणा दुकानदारावरच  कारवाई करून अन्याय करू नये. अशी विनंती शेवगाव किराणा व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.

       या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या चांगल्या मोहिमेला किराणा व्यावसायिकांचा  कायमच पाठिंबा असतो. आणि पुढेही राहील. करोना काळात सर्व नियमाचे पालन करून आम्ही ते सिद्ध केले आहे. ही प्लास्टिक कॅरीबॅगची कारवाई करताना अगोदर नागरिकांना सुचित करण्यात यावे. म्हणजे  दुकानदार व ग्राहक यांच्यात उगीचच वाद होणार नाहीत.  तसेच कारवाई करताना जे दुकानदार अथवा व्यक्ती कॅरीबॅगचा वापर करतील त्यांच्यावर सरसकट कारवाई करावी. हेतू पुरस्कार फक्त किराणा दुकानदारावरच कारवाई करून आमच्यावर अन्याय करू नये. अशी विनंती करण्यात आली आहे.

   तर संघटनेचे सचिव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी मोहिम राबविण्याच्या नगर परिषदेच्या कामकाजाबद्दल आक्षेप घेऊन हे सांगण्यासाठी नगर परिषदेचे दोन तीन पुरुष व दहा पंधरा महिला कामगार मोर्चा काढावात तशा पध्दतीने येतात. या बद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

     निवेदनावर शेवगाव तालुका किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश धूत, उपाध्यक्ष विश्वंभर देहाडराय, सचिव वजीर पठाण, वसंत मोरे,  प्रदीप मेहर, भैय्या लाहोटी, सचिन मुंदडा, गोपीकिसन लोहिया, या पदाधिकाऱ्यांच्या  सह्या आहेत. नगरपरिषदेचे भारत चव्हाण, सहाय्यक कर निरीक्षक दीपक कोल्हे यांनी निवेदन स्वीकारले.