शेवगाव तालुक्यात शांततेत मतदान, शेवगाव बोधेगावी सायंकाळी मतदानासाठी लांबच लांब रांगा

सायंकाळी पाच पर्यत झाले  ५५ .१८ टक्के मतदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३:   लोकसभा निवडणुकीसाठी शेवगाव – पाथर्डी २२२ विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजता शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील ३६५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला ‘सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५.१८ टक्के मतदान झाले. सायंकाळी  पाचपर्यंत या मतदार संघात एकूण एक लाख ९९ हजार २९५ मतदारांनी उमेदवाराचे भवितव्य इव्हीएम मशीन मध्ये सिलबंद केले.

मतदान सायंकाळी ६ वाजे पर्यत चालू रहाणार असल्याने साधारणतः आणखी ५ /७ टक्के मतदान होऊ शकते मतदार भर उन्हातही रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळाले. शेवगाव शहरातील आबासोहब काकडे विद्यालयातील ९४, ९५,९६ या तीन क्रमांकांच्या मतदान केंद्रावर तसेच बोधेगाव येथेही दोन मतदान केंद्रावर  सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या. याठिकाणी अचानक शेकडो मतदार एकत्र दाखल झाल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती.

पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ३१७ मधील कर्मचारी, एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या मतदान केंद्रातील चारही कर्मचारी लगेच बदलण्यात आले.

सकाळी सात वाजता शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील ३६५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात बहुतांशी मतदान केंद्रावर गर्दी नव्हती. सकाळी नऊ वाजता ११.१० टक्के तर सकाळी अकरा वाजता १७.६९ टक्के, दुपारी एक वाजता ३३.६२, दुपारी तीन वाजता ४३.९ टक्के तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५.१८ टक्के मतदान झाले होते.

       दरम्यान भर उन्हातही मतदानासाठी काही ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या. शेवगाव, घोटन, दहिगाव ने, बोधेगाव, बालमटाकळी, अमरापुर, ढोरजळगाव, सह पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, कासारपिंपळगाव, माणिकदौंडी, टाकळीमानुर, खरवंडी, चिंचपुर याठिकाणी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी होती. सायंकाळी सहा नंतरही काही मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहयला मिळाले. नवमतदारांबरोबरच ज्येष्ठ नागरिक यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान चिठ्या बीएलओ मार्फत अगोदरच घरोरघर पोहच झाल्याने मतदार क्रमांक काढून देण्यासाठी मतदान केद्रा बाहेर उमेदवाराचे पेंडॉल नव्हते.

  आमदार मोनिका राजळे यांनी कासारपिंपळगाव, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी दहिगाव ने, तर ऍड प्रताप ढाकणे यांनी अकोले येथे मतदान केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे,  तहसीलदार उद्धव नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, मतदान यंत्र सीलबंद करून रात्री उशिरा अहमदनगरकडे रवाना करण्यात आली.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील बूथ क्रमांक ५१ मध्ये मतदान कक्षेत मोबाईल घेऊन मतदान करते वेळी चित्रीकरण करतांना जावेद बालम पठाण, ( वय २९ रा भाकुडगाव) यास पकडले, त्याच्या विरोधात केंद्र अध्यक्ष रामराव अनंता पवार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.       मतदान खेचण्यासाठी शेवगाव, पाथर्डी या दोन शहरातील मतदानावर नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत करीत सर्वाधिक मतदान असलेल्या विविध गावांना भेटी दिल्या.