सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असलेल्या वसुधाताई (काकू) औताडे यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : नुकतेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील एक आगळी वेगळी विचारसरणी असलेल्या काकु अर्थात कै.सौ.वसुधाताई भानुदास औताडे यांचे दुःखद निधन झाले. जीवन जगताना आपल्याला आयुष्य किती मिळालं यापेक्षा आपण कसे जगलो हे फार महत्वाचे आहे. नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपुलकीने विचारपूस करणाऱ्या काकुंच अल्पशा आजाराने निधन झाले.

सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असलेल्या कै.सौ.वसुधाताई काळाच्या पडद्याआड गेल्या. मात्र, त्यांनी दिलेली शिकवण, धार्मिक व सामाजिक कार्य नेहमी आठवणीत राहील. राहुरी तालुक्यातील साबळे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या जिल्हा बँकेचे व राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै.रावसाहेब साबळे यांच्या धाकट्या भगिनी होत्या. त्यांचे सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण झालेले होते. 

1962 साली त्या पोहेगाव येथील औताडे परिवाराच्या सुनबाई झाल्या. जिल्हा बँकेचे माजी संचालक, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती व कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व कोसंग को ऑपरेटीव्ह डीस्टीलरीचे माजी चेअरमन भानुदास औताडे यांच्या त्या सुविध्य पत्नी होत्या. सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या औताडे परिवारात त्यांनी शेतीसह कुटुंबाच्या प्रपंचाची जबाबदारी सांभाळली. त्यांना अध्यात्माची आवड असल्याने गावातील सप्ताह व इतर धार्मिक कार्यात त्या हिरीरीने भाग घेत असत.

कोपरगाव संगमनेर रस्त्यावर असलेल्या पोहेगाव येथील जागृत खंडोबा देवस्थानच्या त्या परम भक्त होत्या. त्यांच्याच संकल्पनेतून औताडे परिवाराने खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी 35 वर्षापूर्वी पोहेगाव येथे चंपाषष्ठी यात्रेची सुरुवात केली व ती परंपरा अखंडीत सुरु ठेवली. जेजुरी गडावरील वाघ्या मुरळी व पुजारी यांच्यामध्ये काकू प्रसिद्ध होत्या. पोहेगावातील पुरातन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी करून घेतला. दोन महिन्यापूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना कोपरगाव, शिर्डी व नंतर नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले होते.

उपचारात सुधारणा देखील झाली होती. मात्र, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे काकूंचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती भानुदास औताडे, मुले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीन औताडे, प्रगतशील शेतकरी सुनील औताडे व तुषार औताडे यांच्यासह सुना, नातवंडे, दिर, पुतणे असा मोठा परिवार आहे. या परिवाराच्या दुख:त सहभागी होण्यासाठी हजारो‌ नागरिकानी औताडे परिवाराच्या घरी भेटी दिल्या. कै.सौ.वसुधाताई (काकू) औताडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.