उत्तम पिढी घडवणारे शाळा हेच राष्ट्रविकासाचे केंद्र -विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य व आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्याला घडविण्यासाठी शिक्षक व पालक या दोघांची साथ महत्त्वाची आहे. मातीला आकार देऊन मडके घडते. जेव्हा माती ओली असते तेव्हाच तिला आकार देता येतो. जर माती वाळली तर तिचा आकार बदलता येत नाही. तसे शिक्षक व पालक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे दोन मोठे हात असून, या दोघांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली तर उत्तम पिढी घडल्याशिवाय राहणार नाही आणि भारत जागतिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. असे मत सहजानंदनगर (ता. कोपरगाव) येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील वाकडी (ता. राहाता) येथील पांढरी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (२५ नोव्हेंबर) क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले. प्रमोद कोते यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब कोते होते.

याप्रसंगी गणेश साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजी लहारे, विद्यमान संचालक विष्णुपंत शेळके, वाकडी गावच्या नूतन लोकनियुक्त सरपंच रोहिणी आहेर, माजी सरपंच अनिल शेळके, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संजय भवार, शिवसेनेचे महेश जाधव, कोल्हे गटाचे नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य अमोल शेळके, कैलास लहारे, कल्पना लहारे, सविता शेळके, मंगल आहेर, गंगाधर नारंगिरे, तात्या गोरे, विजय आहेर, नंदू कोते, चांगदेव कोते, दत्तात्रय कोते, नितीन साबदे, विष्णुपंत लहारे, दिनकर भवार, ऋषिकेश आहेर, विनायक लहारे, विजय लहारे, नवनाथ शेळके, दत्तात्रय शेळके, भागवत शेळके, किसन शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कोते व सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक कानिफनाथ बोराडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कोपरगाव मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाते. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल प्रमोद कोते व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्यावर शालेय जीवनात शिक्षकांनी चांगले संस्कार केले. स्व. कोल्हेसाहेबांचा अभ्यास व व्यासंग दांडगा होता. फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी कोपरगावात संजीवनी सहकारी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली.

स्व. कोल्हे साहेबांनी लावलेल्या संजीवनीच्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला असून, संजीवनी उद्योग समूह व इतर संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्व. कोल्हे साहेब आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आदर्श राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू तयार झाले पाहिजेत. 

युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, सध्या नगर व नाशिक जिल्ह्यात दुष्काळ असतानाही आपल्या हक्काचे पाणी जायकवाडीला जात असल्याचे मोठे दु:ख आहे. येणाऱ्या पिढीला आपण पाणीटंचाईच देणार आहोत का? असा प्रश्न आहे. भावी पिढीचे जीवन सुखी बनविण्यासाठी पाण्याचा प्रश्न कायमचा वेळीच सुटला पाहिजे व हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.

ते म्हणाले, काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांची स्थिती चांगली आहे. तर काही ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या नाही. वाकडी येथील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशाबरोबर स्वतंत्र झालेला पाकिस्तान आज रसातळाला गेला आहे. इतर देशांच्या अर्थव्यवस्था ढासळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वाखाली भारताचा वेगवान विकास होत असून, आज भारताच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन डॉलरचा मोठा टप्पा पार केला आहे.

भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली असून, सन २०२५ पर्यंत ती ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवून जगात चौथ्या स्थानावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ७०-७५ वर्षांत तत्कालीन राज्यकर्त्यांनी स्वीकारलेली धोरणे, त्या-त्या पिढीने घेतलेली मेहनत, विद्यार्थी, सीमेवरील जवान, शेतकरी, उद्योजक यांनी केलेले परिश्रम याच्या बळावर आज भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात यश मिळवावे. सोबतच देशाची व समाजाची सेवा करावी, अशा शुभेच्छा देऊन शाळेला इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याचे विवेक कोल्हे यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन अॅड. अतुल लहारे तर प्रास्ताविक शिक्षक शिवाजी शिंदे यांनी केले. विवेक कोल्हे यांच्या हस्ते वाकडी गावातील केंद्रीय जि.प.प्रा. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश लहारे, सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.