कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : सभासदाला कमी कालावधीत अधिक सेवा देणे हे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था ही अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी राज्यातील एकमेव संस्था ठरली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी कर्मचाऱ्यांमध्ये ग्राहक, सभासदांना अधिक सेवा देणारी राज्यातील समता ही एकमेव पतसंस्था ठरेल. असे गौरवोद्गार राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्या शुभहस्ते पेपरलेस कॅश भरणा व सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधा शुभारंभ समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यात पतसंस्था चळवळ सक्षम व बळकट करण्याचे काम राज्य फेडरेशन द्वारा काका कोयटे करत आहेत. त्या प्रमाणेच अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकांना कमी कालावधीत अधिक सेवा देण्यात समता नागरी सहकारी पतसंस्था सक्षम बनविली आहे.
सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांचे स्वागत संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले तर चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून संचालक संदीप कोयटे यांनी श्रीरामपूरकरांनी पेपरलेस कॅश भरणा व सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी समता पतसंस्था वापरत असलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयक माहिती दिली. तसेच समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम विषयी चित्रफिती द्वारा सादरीकरण करत संस्थेच्या ९९. ८१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३५ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले.
यावेळी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे, रमेश झांबरे, फकीर शेठ पिपाडा, संस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे कांतीलाल जोशी, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, श्रीरामपूर शाखेचे सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाखाधिकारी फारुख शेख यांनी मानले.