शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेवगाव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीश कालीन चौकी तथा अलिकडच्या काळातील विश्रामगृहाची सध्या मोठी वाताहत झाली आहे. या वास्तूने ब्रीटीश कालातील अनेक कडक प्रशासक पाहिलेत. पुढे लोकल बोर्ड व जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांची झालेली खलबते पाहिलीत. राज्याचे अनेक मंत्री मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार, पंतप्रधान कै. चंद्रशेखर अशी अनेक मातब्बर मंडळी काही काळ येथे विसावली अशी ऐतिहासिक परंपरा असलेली वास्तु सध्या जिल्हा परिषदेच्या अनास्थेमुळे अतिक्रमणाच्या व समस्यांच्या विळख्यात सापडली असून ही वास्तू जुगारी, दारूडे, अनैतिक व्यवहाराचे आश्रयस्थान बनले आहे.
परिसरातील नागरिकानी येथील रिकाम्या जागेला चक्क कचरा डेपो बनवले आहे. आज येथे शेकडो टन प्लॅस्टीक व कचरा साचला आहे. पावसाळ्यापूर्वी तो हालविला नाही, तर रोगराईला निमत्रण ठरणार आहे. शेवगावाच्या बाहेर कांहीशा उंच माथ्यावर ब्रिटीशानी सन १८९८ मध्ये आपल्या सरहद्दीला लागून असलेल्या मोगलाईवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच लगान वसूलीसाठी उभारलेली तत्कालिन चौकी होती.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या वास्तूची मालकी जिल्हा लोकल बोर्डाकडे आली या काळात तहसीलदारांना घोडा गाडी होती. या गाडीचे घोडे बांधण्यासाठी या बंगल्याच्या बाजूलाच पागा उभारण्यात आला. पुढे त्यातच तीन-चार छोट्या खोल्या करून रखवालदार व खानसामाची सोय करण्यात आली. दोन मे १९६१ ला अहमदनगर जिल्हा परिषदेची निर्मिती झाल्यानंतर हा डाक बंगला जिल्हा परिषदेच्या ताब्यात आला. पुढे १९८९ ला भूमी अभिलेख कार्यालयाकडून तांत्रिक चूक झाल्याने या जागेचा वाद सुरू झाला. तो आज हायकोर्टात चालू आहे.
संभाजी नगर – बारामती राज्य मार्गावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे विश्रामगृह असून तिसगाव मार्गे नगर व मिरी मार्गे नगर जाणाऱ्या राज्य मार्गामध्ये शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या परिसराचा वापर सध्या लघुशंका, प्रातर्विधीसाठी व केरकचरा टाकण्यासाठी केला जातो. या वास्तूच्या दोन बाजूनी टपऱ्यांचे अतिक्रमण झालेले असून अनेक गांजेकस येथे बंगल्याच्या पडवीत वृक्षांच्या खोडाजवळ समाधी लावतात तर अनेक जण अनैतिक उद्योगधंद्यासाठी या जागेचा वापर करतात.
सध्या शेवगाव शहराची चोहोबाजूंनी भौगोलिक वाढ झाल्याने आज ही वास्तू मध्यवर्ती आहे. शासकीय कामकाजा निमित्त अधिकारी वर्गाचा शेवगावी राबता असल्याने जिल्हा परिषदेने या वास्तूचे मागे अनेकदा नुतनीकरण केले आहे. ही मालमत्ता आपली असल्याचा दावा एकाने काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला असला तरी उच्च न्यायालयाने विश्रामगृहाच्या विस्तारित सुधारणा करण्यास जिल्हा परिषदेस परवानगी दिली आहे.
तथापि काहींच्या अर्थकारणामुळे जिल्हा परिषदेने या मालमत्तेबाबत कमालीची उदासीनता दाखविल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे येथील खानसामा व रखवालदाराच्या निवृत्तीनंतर येथे दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. अनेक दिवसापासून बंगल्याचे टाळे ही उघडण्यात आले नाही. त्यामुळे आतील लाखो रुपयांच्या किंमती फर्निचरला व साहित्याला पाय फुटले आहेत.
विश्रामगृहाच्या बाहेर टपऱ्याचे अतिक्रमण वाढले आहे. आतील बाजूस अनेक जून्या वृक्षांची बंगल्याच्या काही भागाची पडझड झाली आहे. या वास्तूला मोठा व्हरांडा आहे. तेथे निरव शांतता असल्याने दारुडे, गांजेकस, तृतियपंथिय, अवैध व्यावसायिक येथे थांबतात. अवैध धंद्याचे मनसुबे येथे ठरतात. त्यातील व्यवहाराच्या वाटण्या, हिशेब येथे होतात.
अतिक्रमण केलेले व्यवसायिक विश्रामगृहाच्या आवारातच केरकचरा फेकत असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.