शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : अलिकडे कुठलीही निवडणूक असो, सोशल मिडीया प्रचार कार्यात आघाडीवर असतो. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर निवडणूक ज्वर जोरात होता. विशेषतः युवक वर्गाच्या अंगात तो अधिक भिणला होता.
आता निवडणूक संपल्यानंतर वेगवेगळ्या संदेशांचा महापूर आला आहे. त्यातून या निवडणुकीचा ताप आवरण्याची आव्हाने होऊ लागली आहेत. संपले इलेक्शन जपा रिलेशन असे प्रेमाचे संदेश व्हाट्सअप ग्रुपवर फिरत आहेत. मिष्कील विनोदासह गुणगौरव करण्यापासून तर काहीचे जमेल तसे पितळ उघडे करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रकारांना अक्षरशः उतआला होता.
आपल्याकडील निवडणूक संपल्यानंतरही हा प्रकार लगेच कमी झाला नाही. राजकीय भांडणे थांबविण्याच्या आव्हानापासून ते निवडणूक अंदाजापर्यंत सगळ्या विषयाचे संदेश सुरुच आहे. मात्र प्रचार काळात असलेला टीकेचा सूर, कडवटपणा आता ओसरला असून, निवडणुका संपल्या आहेत आता जवळच्याशी असलेले संबंध जपा असे सांगणारा, ‘संपले इलेक्शन, जपा रिलेशन ‘ अशा आशयाचे संदेश माध्यमातून संचार करत आहेत.
निवडणुकीतील विरोध राजकीय होता. व्यक्तिगत नव्हता यामुळे कोणी दुखावले गेला असाल तर माफी असावी. राजकारण निवडणुकी पुरते असते व मैत्री ही आयुष्यभर साथ देणारी असते. प्रचार संपला विरोध. पुन्हा मैत्रीच्या पक्षात प्रवेश करू या ” असा सल्ला देणारे सदेश आता फिरू लागले आहेत. येथे लोकसभा निवडणूक संपताच सायंकाळपासून त्याची जागा समजूतदारपणा आणि राजकारणा पलीकडे जाणाऱ्या आव्हानाच्या संदेशांनी घेतल्याचे चित्र आहे.