२०२४ ला मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीच ठरवेन – चव्हाण

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : वंचित बहुजन आघाडी हा मॅनेज होणारा नव्हे तर विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा आणि डॅमेज करणारा पक्ष आहे. हे आम्ही गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यात सिध्द केले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीने शेवगाव-पाथर्डी तालुक्यात २७ जागा जिंकल्या असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

     शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व निवडणुक लढवणार्‍या कार्यकर्त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त समितीचे राज्य सहसमन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, उपाध्यक्ष बन्नोभाई शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, पाथर्डी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हस्के, शेवगाव तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, सुनीता जाधव, रोहिणी ठोंबे, मनिषा आंधळे यांच्यासह शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी चव्हाण म्हणाले, निवडणुका लढविणे ही कुठल्याही एका पक्षाची किंवा जातीची मक्तेदारी नाही, तर सर्व पक्षातील सर्व छोट्यामोठ्या जाती-जमातीमधील गोरगरिब व सर्व सामान्य कार्यकर्ता देखील निवडणूक लढवू शकतो, निवडुन येवू शकतो व सत्ता मिळवू शकतो हे वंचित बहुजन आघाडीने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जनतेला दाखवून दिले.

गोरगरिब तरुण कार्यकत्यांनी देखील मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, यापुढील निवडणुकितीत प्रस्थपितांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. गोरगरिबांची कामे केली पाहिजेत. मतदारसंघातील कारखानदारांना फक्त निवडणूका आल्या की, जनता आठवते इतर वेळेस जनतेला वार्‍यावर सोडून दिले जाते. हे मतदारांच्या लक्षात आले आहे.

     यानंतर दुसर्‍या टप्प्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका व विधानसभेची निवडणुक देखील वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढविणार असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे देखील वंचित बहुजन आघाडीच ठरवेल असेही ते म्हणाले.

   यावेळी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेल्या २७ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र ऊर्फ भोरु म्हस्के व त्यांच्या सहकार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. संजय चव्हाण व संजय कांबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. बन्नाभाई शेख यांनी आभार मानले.