कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असणाऱ्या अनेक नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणा मध्ये अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा नागरिकांनी तातडीने आपले अर्ज कोपरगाव नगरपरिषदेकडे दाखल करून अतिक्रमित जागेचे सात बारा उतारे नावावर होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची जागा नियमानुकूल करून या नागरिकांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नातून जागा नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची अंतिम कार्यवाही कोपरगाव नगरपरिषदेकडून सुरु आहे.
परंतु अजूनही अनेक नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणा मध्ये आपले अर्ज कोपरगाव नगरपरिषदेकडे दाखल केलेले नाहीत. ज्या नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत अशा नागरिकांच्या नावाची यादी कोपरगाव नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे.
या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शासकीय जागेवरील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. ज्या नागरिकांचे या यादीमध्ये नाव आलेले नाही त्या शासनाच्या जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्यांच्या जागा नियामानुकूल करण्यासाठी लेखी अर्ज दि. २५ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षात जमा करावेत.
शासकीय जागेवरील वास्तव्यास असणाऱ्या कोणत्याही नागरिकांची जागा नियमानुकूल होण्यापासून राहणार नाही यासाठी ज्या नागरिकांनी आजपर्यंत जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणा मध्ये अर्ज दाखल केलेले नाही. अशा नागरिकांनी तातडीने आपले अर्ज सदरच्या मुदतीत दाखल करावे व कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कोपरगाव जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.