शेवगावात रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आपत्कालिन गरज ओळखून ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : अपघात, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया बालके अशा रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासत होती. तशात सध्या जिल्ह्यातील रक्त पेढ्यामध्ये रक्त पिशव्यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. सध्याच्या तीव्र उन्हामुळे व दाट लग्न तीथि मुळे रक्तदान शिबीरेही होत नसल्याने येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही निकड लक्षात घेऊन शेवगावात  रविवारी आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित केले. अवघ्या एक दिवसापूर्वी केलेल्या आवाहनास शेवगावकरांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ७२ रक्तदात्यानी रक्तदान केले.

शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात अहिल्या नगर येथील जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर, शरद बळे यांच्या पथकाने सक्तदान स्विकारले. सामाजिक कार्यकर्ते तथा शिबीराचे आयोजक डॉ. कृष्णा देहाडराय, डॉ. प्रदीप उगले, डॉ. उज्वल धूत, डॉ. निरज लांडे, जगदीश धूत, सुरज लांडे यांनी शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले.