कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : देश विदेशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साई भक्तांना शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबत लवकरच मंत्रालयात सबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच श्री साईबाबा विमानतळ संचालक गौरव उपशाम व टर्मिनल इनचार्ज कृष्णा पॉल यांच्या समवेत शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळावर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, विमानतळाच्या अडचणी व स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाबरोबरच विमानतळ प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या उपाय योजनांबाबत बैठक घेतली. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
आमदार काळे म्हणाले की, देश विदेशातून विमानाने येणाऱ्या साईभक्तांना देशातील इतर विमानतळावर मिळणाऱ्या सोयी सुविधा शिर्डी विमानतळावर देखील मिळाल्या पाहिजेत यासाठी महायुती शासनाकडून शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळाच्या विकासासाठी १५१७ कोटीचा निधी मंजूर करून आणला असून शिर्डी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्यासाठी मंत्रालयात तातडीने बैठक लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विमानतळ प्रशासनाने स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या पदासाठी स्थानिक युवकांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देवून त्या पदावर स्थानिक युवकांची नियुक्ती करावी.
तसेच विमानतळ प्रशासनाकडून स्थानिक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये काकडी, म्हसोबा मंदिर, डांगेवाडी याठिकाणी पिण्याची पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी तातडीने वर्क ऑर्डर काढण्याच्या तसेच म्हसोबा मंदिर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना विमानतळ संचालक गौरव उपशाम व टर्मिनल इनचार्ज कृष्णा पॉल यांना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीसाठी बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, गोकुळ कांडेकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.